जम्मू काश्मीरच्या पुलवामा या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून होणार आहे. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने यासंदर्भातल्या तपासाची जबाबदारी एनआयएकडे अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवली आहे. यासंदर्भातल एका 12 सदस्यीय समितीची स्थापना कऱण्यात आली आहे. ज्यामध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञांचाही समावेश आहे. तर इतर वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची एक टीम शुक्रवारी सकाळी दिल्लीहून श्रीनगरला रवाना होईल, या टीममध्ये एका आयजी रँकच्या अधिकाऱ्यासह एकूण 12 जणांचा समावेश असणार आहे. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तिथला तपास ही टीम करणार आहे. हल्ल्याशी संबंधित पुरावे गोळा करण्याचं काम एनआयएची टीम करणार आहे.

 

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत बैठकांचं सत्र वाढलं आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या भ्याड हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनीही दिल्लीत एक बैठक बोलावली आहे. ते त्यांचा भूतान दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. इतकंच नाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील काश्मीरचा दौरा करणार आहेत. एक उच्चस्तरीय बैठक श्रीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे या बैठकीतही राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत.