२०२२पूर्वी प्रत्येकाला स्वतःचे घर असावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असून हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारने शहरांमध्ये ५४ लाख घरांना तर १ कोटींपेक्षा अधिक ग्रामीण भागातील जनतेच्या घरांसाठी मंजुरी दिली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. लखनऊमध्ये मोदी सरकारने शहर विकासासंबंधी सुरु करण्यात आलेल्या तीन महत्वपूर्ण योजनांना तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


मोदी म्हणाले, शहरातील गरीब आणि बेघर लोकांना पक्की घरे देण्याचे अभियान असो, १०० स्मार्टसिटीचे काम असो किंवा ५०० अमृत सिटी निर्माण करण्याचे काम असो. करोडो जनतेचे जीवन सरळ, सोपे आणि सुरक्षित बनवण्याचा आमचा संकल्प तीन वर्षांनंतर अधिक मजबूत झाला आहे. लखनऊ शहराचा विकास तर अटलजींच्या व्हिजनचा परिणाम आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जी घरे दिली जात आहेत. ती माता-भगिनींच्या नावावर दिली जात आहेत. या योजनेंतर्गत सुमारे ८७ लाख घरांची नोंदणी महिलांच्या नावावर किंवा विभागून करण्यात आली आहे. मी देखील गरीबीतून वर आलो आहे. त्यामुळे मी गरीब आईचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. गरीबीने मला हिम्मत आणि प्रामाणिकपणा दिला. गरीबांचा आणि पीडितांचा मी भागीदार आहे.

मोदी म्हणाले, येथे केवळ नव्या व्यवस्थेचे निर्माण होत नसून फंडिंगसाठी विविध पर्यायही समोर येत आहेत. पुणे, हैदराबाद आणि इंदोरमध्ये म्युनिसिपल बॉन्डसच्या माध्यमांतून सुमारे ५५० कोटी रुपये जमा केला आहेत. आता लवकरच लखनऊ आणि गाजियाबादमध्ये देखील ही योजना सुरु करणार आहोत.