पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात पुन्हा एकदा झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाल्याचे शुक्रवारी पोलिसांनी सांगितले. त्यानंतर येथील तृणमुल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते या स्फोटासाठी एकमेकांना जबाबदार ठरवत आहेत. दरम्यान, बोरोगिरा गावातील या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या दोघा जणांना नजीकच्या दुर्गापूर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दोघेजणही तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते असून भाजपच्या लोकांकडून आपल्यावर बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपने मात्र, हा आरोप फेटाळत हे दोघेजणही बॉम्ब तयार करताना जखमी झाल्याचा दावा केला. दोन्ही राजकीय पक्षांकडून अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी वर्धमान जिल्हय़ात २ ऑक्टोबरला झालेल्या बॉम्बस्फोटामागे जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी शाहनूर आलम याने त्याचे जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा कबुलीजबाब देताना या संघटनेचे जाळे पश्चिम बंगालमध्ये पसरवले असल्याचेही सांगितले होते. जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश ही दहशतवादी संघटना बांगलादेशच्या विरोधात काम करते व या संघटनेत सामील होण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला गेला व त्यामुळे त्याने शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये आश्रय घेतल्याचेही त्याच्या जाबजबाबात स्पष्ट झाले होते.