अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, या खटल्यात मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राजीव धवन यांना धमक्या आल्या आहे. या घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून, धमक्या देणाऱ्या दोघांना नोटीस बजावली आहे.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सौहार्दपूर्ण समेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने ६ मे रोजी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला आहे. त्यातून कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यानंतर या प्रकरणी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर १८ दिवसांपासून सुनावणी होत असून एम, सिद्दीकी आणि ऑल इंडिया सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने वरिष्ठ वकील राजीव धवन हे घटनापीठासमोर बाजू मांडत आहे.

मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडत असल्याबद्दल राजीव धवन यांना दोन जणांकडून धमक्या आल्या आहेत. १४ ऑगस्ट २०१९ रोजी यांना एन. शनमुगम यांचे धमकीचे पत्र मिळाले. शनमुगम हे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी असून, त्यांनी मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडण्याला विरोध करीत धमकी दिली आहे. धवन यांनी वकिली सोडून द्यावी अन्यथा माझ्या हातून गुन्हा घडेल, असे त्या पत्रात म्हटलेले आहे. याचबरोबर न्यायालयाच्या परिसरात आणि घरीही अनेकांनी याबद्दल हटकले आहे, असा आरोपही धवन यांनी केला आहे.

धवन यांनी राजस्थानमधील संजय कलाल बजरंगी या व्यक्तीविरूद्धही अवमानना याचिका दाखल केली आहे. संजय कलाल बजरंगी यांनी धवन यांना व्हॉट्स अॅपवरून मेसेज केला होता. तसेच त्याने न्यायालयाच्या प्रशासनातही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता, असे धवन यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी न्यायालयाने धमकी देणाऱ्या दोघांनाही नोटीस पाठवली आहे.