वारंवार काश्मीर राग आळवणाऱ्या पाकिस्तानला भारताने संयुक्त राष्ट्र संघात फटकारले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी काश्मीर आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा असून आम्ही त्याबाबत आवाज उठवतच राहणार असल्याचे म्हटले होते. काश्मिरी लोकांच्या भावनेविरोधात भारत सरकार तिथे राज्य करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. परंतु, संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी याप्रकरणी पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका करत आम्ही नव्या सरकारकडून सकारात्मक पुढाकाराची अपेक्षा बाळगतो, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. छ्दम राजकारणातून बाहेर येत सकारात्मक विचारांनी पाकिस्तानने पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी सुनावले.

दक्षिण अशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून पुढाकाराची आवश्यकता आहे. पाकिस्तानमध्ये वैधानिक अस्तित्व असलेले प्रतिनिधी मंडळ नाही. जर ते काश्मीरप्रश्नी काही बोलत असतील तर त्याचा काहीच अर्थ नसल्याचे अकबरूद्दीन यांनी म्हटले.

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना समर्थन देण्याची भूमिका कायम राहील, असे वक्तव्य करत पाकिस्तानने भारताला भडकवण्याचा प्रयत्न केला होता. काश्मीरमधील सध्याचा संघर्ष योग्य आहे, असे शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले होते. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचे (पीओके) पंतप्रधान राजा फारूख हैदर यांची भेट घेत पाकिस्तानचे नवे सरकार काश्मीरबाबत जुने सरकारी धोरण कायम ठेवणार असल्याचे म्हटले होते.