तोंडावर आलेल्या दिल्लीच्या निवडणूक प्रचारातही काँग्रेसने दिल्लीचा विकास आराखडा आणि अन्नसुरक्षा विधेयक या दोन मुद्दय़ांवरच अधिक भर दिला़  शहरातील प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मुद्दय़ांना स्पर्श करीत चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या शीला दीक्षित यांचे जोरदार समर्थन केल़े
मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील प्रचार सभांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला लक्ष्य करणाऱ्या राहुल यांनी दिल्लीतील प्रचारात मात्र विकासाच्या मुद्दय़ावरच भर दिला़  मुझफ्फरनगरमधील दंगलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संदर्भही त्यांनी आपल्या भाषणात येऊ दिला नाही़
दिल्लीबाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठी आह़े  एकूण लोकसंख्येत त्यांचे प्रमाण तिसऱ्या स्थानावरचे आह़े  त्यामुळे त्यांचे निवडणुकीतील महत्त्व ओळखून त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी, ‘काँग्रेस शासन नेहमीच त्यांच्यासोबत राहील’, अशी घोषणाही या वेळी करण्यात आली़  ४५ अनधिकृत वसाहतींचे अधिकृत करण्याची घोषणा करून अनधिकृत वसाहतींतील मतदारांसाठीही साखर पेरणी या सभेत करण्यात आली़ दिल्ली मेट्रोचे अनुकरण देशातच नव्हे तर देशाबाहेर इंडोनेशियासारख्या अनेक ठिकाणी करण्यात आल्याचे आठवणही राहुल यांनी या वेळी करून दिली़