करोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रोजगारनिर्मितीमध्ये मोठी घट झाली आहे. पण लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली होती. मात्र, आता देशात अनलॉक झाल्याने रोजगारनिर्मितीत वाढ होत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या पॅरोल डेटानुसार नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, ईपीएफओमध्ये नवे ग्राहक म्हणजेच नव्या नोकरदारांची संख्या या वर्षी जून महिन्यांत ५.५२ लाख होती. तर जुलै महिन्यांत यात वाढ होऊन ती ६.४८ लाखांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा नव्या नोकऱ्यांची भर पडली आणि ईपीएफओशी ६.७ लाख नोकरदार जोडले गेले. मात्र, लॉकडाउन संपल्यामुळे अर्थव्यवस्था खुली झाल्याने नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे.

गेल्या जून महिन्यात देशात १२.०२ लाख नवी रोजगार निर्मिती झाली होती. मात्र, भारतात यावर्षी करोनाविषाणूमुळे मार्चमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. हा लॉकडाउन मेच्या शेवटापर्यंत सुरु होता जो जूनच्या सुरुवातीला काही अटी-शर्तींसह सुरु झाला. याचा परिणाम असा झाला की, या वर्षी जून महिन्यांत ५.५२ लाख रोजगार निर्मिती झाली. जी गेल्यावर्षीच्या तुलनेत ५४ टक्के कमी होती. याच प्रकारे जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४७ टक्के कमी रोजगार निर्मिती झाली. ऑगस्टमध्ये रोजगार वाढल्यानंतरही गेल्या वर्षी १० लाख नव्या रोजगाराच्या तुलनेत यावेळी ३३ टक्के कमी नोकऱ्यांची निर्मिती झाली.

ईपीएफओच्या पॅरोल डेटानुसार, नव्या ग्राहकांमध्ये महिलांचे प्रमाण ऑगस्ट महिन्यांत २० टक्क्यांहून कमी आहे. तर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एकूण नव्या ग्राहकांपैकी २३ टक्के महिलांचे प्रमाण होते. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) संचालक महेश व्यास यांनी द टेलिग्राफ या वर्तमान पत्राशी बोलताना सांगितले की, ईपीएफओमध्ये जास्त ग्राहक जोडले जाणे हा चांगला संकेत आहे. मात्र, अजूनही गेल्यावर्षीच्या तुलनेत याची संख्या खूपच कमी आहे. सणावाराच्या काळात कायम बाजारातील व्यवहार वाढतात. मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत हा ट्रेंड कायम राहतो का? हे पहाणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.