उत्तर प्रदेश बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल घोषीत झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तर प्रदेश बोर्डाचा दहावीचा एकूण निकाल ८३.३१ टक्के लागला आहे. त्यामध्ये ७९.८८ टक्के मुलं तर ८७.२९ टक्के मुली पास झाल्या आहेत. अशाचप्रकारे बारावीच्या बोर्डाचा निकाल ७४.६३ टक्के लागला आहे. यामध्ये ८१.९६ टक्के मुली तर ६८.८८ टक्के मुलं पास झाली आहेत.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी शनिवारी लोकभवनात दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल घोषीत केला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल चांगला लागल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दहावी आणि बारावीमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थांना एक लाख रुपये आणि लॅपटॉप भेट म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी शर्मा यांनी केली.

दहावीमध्ये २७ लाख ७२ हजार ६५६ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २३ लाख ९ हजार ८०२ विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीमध्ये रिया भरत जैन हिने ९६.६७ टक्केंसह उत्तर प्रेदश बोर्डात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अभिमन्यु रामहित वर्मा यानं ९५.८ टक्के गुणांसह दुसरा तर योगेश प्रताप सिंह यानं ९५.३३ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे.

बारावीचा निकाल ७४.६३ टक्के लागला आहे. २५ लाख ८६ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ लाख ५४ हजार ९९ विद्यार्थी पास झाले. ९७ टक्के गुण घेऊन अनुराग मलिक उत्तर प्रदेश बोर्डात अव्वल आला आहे. दुसऱ्या स्थानावर प्रयागराजमधील प्रांजल सिंह असून त्याला ९६ टक्के गुण मिळाले आहेत. तिसऱ्या स्थानावर औरयातील उत्कर्ष शुक्ल असून त्याला ९४.८० टक्के गुण मिळाले आहेत.