जद (यु) आणि भाजपने अलीकडेच एकमेकांना दूषणे दिल्याने दोन्ही पक्षांमधील तिढा वाढत चालल्याच्या चर्चेला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी पूर्णविराम दिला. आमची युती समन्वयाने उत्तम काम करीत असून भविष्यातही युती अभेद्य राहील, अशी ग्वाही नितीशकुमार यांनी दिली.
बिहार विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जद  (यु)च्या दोन आणि भाजपच्या एका उमेदवाराचा अर्ज भरण्यात आला, त्यानंतर नितीशकुमार यांनी दोन्ही पक्ष समन्वयाने काम करीत असल्याची ग्वाही दिली. या निवडणुकीतील जागावाटपाने युतीला अधिक बळकटी आल्याचा दावाही त्यांनी केला.
दिल्लीत काही दिवसांपूर्वी जद (यु)च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन झाले. त्यामध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाला जद (यु)ने विरोध दर्शविला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील तिढा वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी जद(यु)वर तीव्र टीका केली होती. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राज्यातील एनडीएचे निमंत्रक नंदकिशोर यादव यांनीही एनडीएतील घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय असल्याचा निर्वाळा दिला आहे.
येत्या सार्वत्रिक निवडणुकीत जद(यु) पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार यांचेही नाव पुढे करीत नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले होते.