चीन सरकारने  शुक्रवारी करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचा दावा केला आहे. वुहान येथील विषाणूग्रस्त रुग्णांवर उपचाराशी संबंधित कामांसाठी यंत्रमानव तैनात करण्यात आले आहेत.

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग  यांनी या रोगाच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी क्लाउड कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता , डिजिटल तंत्रज्ञान यांचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

चीनमध्ये करोना विषाणूच्या बळींची संख्या आता १६३१ झाली असून शुक्रवारी १४३ जण मरण पावले, तर २६४१ नवीन रुग्णांना संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.

चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी हुबेई प्रांतात १३९ बळी गेले असून २४२० नवीन रुग्ण सापडले आहेत. हेनानमध्ये दोन तर बीजिंग व चोकिंग येथे प्रत्येकी एक जणाचा मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृतांची संख्या १४३ झाली असून निश्चित रुग्णांत ११३८ जणांची भर पडली आहे. ३१ प्रांतात एकूण १६३१ बळी आतापर्यंत गेले आहेत. हुबेई प्रांतातील एकूण रुग्णांची संख्या ५४४०६ झाली असून देशातील रुग्णांची संख्या ६७५३५ झाली आहे.

चीनबाहेर करोनाचे एकूण ५८० रुग्ण असून तीन बळी गेले आहेत.

जपानी जहाजावरील भारतीयांच्या प्रकृतीत सुधारणा

जपानमध्ये नांगर टाकून असलेल्या डायमंड प्रिन्सेस या क्रूझ जहाजावरील ज्या भारतीयांना करोना विषाणूचा संसर्ग झाला होता त्या तीन जणांची प्रकृती आता सुधारत आहे. आता या जहाजावर भारतीयांमध्ये एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. जहाजावर ज्यांना लागण झाली आहे त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जपानमधील भारतीय दूतावासाने दिली आहे.

हे क्रूझ जहाज या महिन्याच्या सुरुवातीला जपानच्या किनाऱ्यावर आले असून त्यावर ३७११ लोक असून त्यात १३८ भारतीय आहेत. त्यातील १३२ कर्मचारी व सहा प्रवासी आहेत. जहाजावरील २१८ जणांना सीओव्हीआयडी १९ विषाणूची लागण झाली आहे.

भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, या लोकांची क्रूझ जहाजावरून सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना विलगीकरणाचा काळ संपल्याशिवाय सध्यातरी हलवता येणार नाही. एकूण तीन भारतीयांची प्रकृती सुधारली असून कुणा नवीन नागरिकात विषाणूचा संसर्ग दिसून आलेला नाही. जपानमधील भारतीय दूतावास व जहाज व्यवस्थापन कंपनी यांच्यात या भारतीयांची सोडवणूक करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या भारतीय नागरिकांना विलगीकरण काळ संपल्यानंतर जहाजावरून उतरवले जाईल व नंतर त्यांना भारतात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल पण त्यासाठी त्यांच्या विषाणू चाचण्या नकारात्मक आल्या पाहिजेत, असे दूतावास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या जहाजावरील एक जण हाँगकाँगला गेल्या महिन्यात उतरला होता त्याला या सीओव्हीआयडी १९ विषाणूची लागण झाली होती.  भारतीय दूतावासाने जहाजावरील सर्व भारतीयांना इमेल पाठवला असून त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

जपान सरकारने गुरुवारी असे जाहीर केले की, ८० किंवा त्यावरील वयाच्या लोकांना त्यांची चाचणी नकारात्मक आली तर जहाजावरून लगेच उतरण्यास परवानगी दिली जाईल, जे लोक वयाची अट पूर्ण करतात व ज्यांना जहाजावर बाल्कनीची सोय नाही त्यांना यात प्राधान्य राहील. या अटीत एकही भारतीय बसत नाही.