करोना विषाणूग्रस्त वुहानमध्ये वैद्यकीय सामुग्री पोहोचवण्यासाठी आणि तेथील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सज्ज असलेल्या विमानाला परवानगी देण्यास चीन हेतुत: विलंब करीत असल्याचा आरोप भारताने शनिवारी केला.

जपान, युक्रेन आणि फ्रान्स यांच्या विमानांना परवानगी दिली असताना भारतीय विमानास परवानगी देण्याबाबत चीन चालढकल करीत आहे. भारताच्या विनंतीला चीनने मान्यता दिलेली नाही. दरम्यान चीन दूतावासातील प्रवक्त्याने मात्र हा आरोप फेटाळला असून भारतीय विमानाला वुहान येथे उतरण्यास परवानगी देण्यास जाणूनबुजून विलंब करण्यात येत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

करोनाग्रस्त हुबेई प्रांत आणि वुहान शहरात अजूनही काही भारतीय अडकले आहेत. चीनला वैद्यकीय मदत पाठवण्याबरोबरच तेथील भारतीयांना परत आणण्यासाठी भारताचे ‘सी १७’ हे लष्करी विमान सज्ज आहे. हे विमान खरेतर २० फेब्रुवारीला चीनला रवाना होणे अपेक्षित होते, पण त्याला अजून परवानगी मिळालेली नाही, चीन जाणूनबुजून परवानगी देण्यास विलंब करीत आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पत्र पाठवून करोना विषाणूविरोधात लढाईत भारत चीनमधील लोकांच्या पाठीशी असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याचबरोबर वैद्यकीय मदत पाठवण्याचे जाहीर केले होते.

दरम्यान भारताने याआधी ६४० नागरिकांना वुहान येथून भारतात परत आणले होते. अजून शंभर भारतीय वुहानमध्ये असून अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांची चीनमधून सुटका केली आहे.

भारताचा दावा : अनेक भारतीय वुहानमध्ये अडकून पडले असून ते मायदेशी येण्यासाठी वाट पाहात आहेत. त्यांचा मानसिक ताण वाढला असून ते नैराश्यात आहेत. वुहानला जाणाऱ्या विमानाबरोबर चीनला मदत साहित्यही पाठवण्यात येणार आहे. मास्क आणि इतर वैद्यकीय सामुग्रीची टंचाई असतानाही भारताने ही मदत देऊ केली आहे. त्यात ग्लोव्हज, सर्जिकल मास्क, फिडिंग पंप, डिफायब्रिलेटर्स यांचा समावेश आहे.

चीनचे म्हणणे :

चीन दूतावासातील प्रवक्ते जी रोंग यांनी भारताच्या आरोपाचे खंडन केले आहे. हुबेई प्रांतातील परिस्थिती गुंतागुंतीची आहे. त्यामुळे चीन हेतुत: भारतीय विमानाला परवानगी नाकारत असल्याचा आरोप गैर आहे. वुहानमधील भारतीयांचे आरोग्यरक्षण चीनच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यांना भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही देशांचे संबंधित विभाग एकमेकांच्या संपर्कात आहे, असेही रोंग यांनी स्पष्ट केले.