आज भारताचं चांद्रयान २ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले.  श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले.  हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. मात्र चांद्रयान आणि बाहुबली सिनेमा यांचं कनेक्शन तुम्हाला ठाऊक आहे? चांद्रयान २ चे वहन करणाऱ्या रॉकेटला बाहुबली हे नाव देण्यात आले. हे रॉकेट अत्यंत भव्य असल्याने हे नाव निवडण्यात आले. आमच्या सिनेमाचे नाव भारताच्या चांद्रयान मोहिमेशी संबंधित आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे असे ट्विट बाहुबली या ऑफिशियल अकाऊंटच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे.

कोट्यवधी भारतीय चांद्रयान २ मोहिमेची वाट बघत होते. या मोहिमेत बाहुबली या नावाचा वाटा होता हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे असेही या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे. तसेच हे चांद्रयान अवकाशात सोडण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचेच आम्ही अभिनंदन करतो असेही या ट्विटमध्ये नमुद करण्यात आले आहे.

सगळ्याच भारतीयांसाठी अभिमानाची असणारी ही मोहीम आहे. चांद्रयान २ हे इस्त्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान २ चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपण झाल्यानंतर सगळ्यांनीच टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. चांद्रयान २ या यानाचा हा सुरुवातीचा काळ आहे. सुरुवातीला रॉकेटचा वेग नियमित असणार आहे असेही इस्त्रोने सांगितले आहे. चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावल्याने इस्रोने पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान २ ची यात्रा ४५ दिवसांपेक्षा जास्त दिवसांची असणार आहे.