तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी खासदार अभिषेक बॅनर्जी यांना शनिवारी सरचिटणीसपदावर पदोन्नत केले.

एका व्यक्तीला पक्षात केवळ एकाच पदावर राहता येईल असा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीने घेतला असून, प्रमुख नेत्यांच्या समितीने (कोअर कमिटी) याला मान्यता दिली आहे, असे तृणमूलचे नेते पार्थ चॅटर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘आमच्या पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी खासदार अभिषेक बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेसचे अ.भा. सरचिटणीस नेमले आहे’, असे चॅटर्जी म्हणाले. यापूर्वी दिवसा पक्षाच्या दोन महत्त्वाच्या बैठका पार पडल्या.

ममता बॅनर्जी यांचे भाचे असलेले अभिषेक हे सध्या या पदावर असलेले सुब्रत बक्षी यांची जागा घेतील; तर सायनी घोष यांना पक्षाच्या युवक शाखेच्या अध्यक्ष करण्यात आले आहे. यापूर्वी हे पद अभिषेक यांच्याकडे होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

लस लाभार्थ्यांना ममतांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र

पश्चिम बंगालमध्ये १८-४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र असलेले लस घेतल्याचे प्रमाणपत्र राज्य सरकारच्या वतीने देण्यात येत आहे. राज्य सरकारने स्वखर्चाने लस उत्पादकांकडून थेट लस घेण्यास सुरुवात केल्यानंतर ममतांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.