टाळेबंदी करून केंद्र सरकारने काय साधले, असा सवाल बुधवारी राज्यसभेत विरोधकांनी केला. करोनाच्या मुद्दय़ावर वरिष्ठ सभागृहात काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले होते.

टाळेबंदीमुळे देशभरात १४ ते २९ लाख लोक करोनाबाधित होण्यापासून बचावले, तर ७८ हजार संभाव्य मृत्यू रोखता आले, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी राज्यसभेत केला होता. आरोग्यमंत्र्यांच्या आकडेवारीला आव्हान देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले, ही आकडेवारी केंद्राने कशाच्या आधारावर दिली? त्यासाठी कोणता शास्त्रीय आधार आहे? टाळेबंदीची आधी तयारी केली होती की नाही याची चर्चा झाली पाहिजे. त्याचा फायदा किती झाला आणि नुकसान किती झाले हे देशाला समजले पाहिजे, असा युक्तिवाद आनंद शर्मा यांनी केला. टाळेबंदीच्या काळात किती मजुरांचा मृत्यू झाला याची आकडेवारीदेखील केंद्राकडे नाही. आता तरी केंद्राने मजुरांच्या आकडेवारीसाठी ‘राष्ट्रीय माहितीसंच’ निर्माण केला पाहिजे, अशी सूचना शर्मा यांनी केली.

सहस्रबुद्धे यांची महाविकास आघाडीवर टीका

भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या करोनाच्या हाताळणीवर आणि धोरणावर टीका केली. राज्याचा कारभार मंत्रालयातून नव्हे तर घरातून चालतो, अशी टिप्पणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. करोनासाठी कृतिगट तयार केला, पण त्याच्या शिफारशी विचारात घेतल्या गेल्या नाहीत. सरकार, महापालिका, प्रभाग अधिकारी यांच्यात कोणताही समन्वय नाही. २ हजार खाटांचे जम्बो कोव्हिड रुग्णालय रिकामे आहे कारण तिथे डॉक्टर नाहीत. पदे भरली जात नाहीत. टाळेबंदीतही सुसूत्रता नाही, चार-चार दिवसांची टाळेबंदी करून राज्य सरकारने व्यापारी वर्गाचे नुकसान केले, असा शाब्दिक हल्ला सहस्रबुद्धे यांनी केला. लोकांचा सरकारवर विश्वास नसेल तर हे सरकार कसे चालणार, असेही सहस्रबुद्धे म्हणाले.

‘काळजी न करणारा’ फंड!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी टाळेबंदी लागू झाल्यानंतर चर्चा केली होती, त्यापूर्वी नव्हे, असे ‘स्पष्टीकरण’ तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी दिले. करोनासाठी तयार केलेला पीएम केअर फंड हा जगातील सर्वात अपारदर्शी फंड असून तो ‘कुडन्ट केअर’ फंड (काळजी न करणारा फंड) असल्याची टीकाही त्यांनी केली. करोनाच्या काळात दोन प्रतिमा देशाने पाहिल्या. एकामध्ये पश्चिम बंगालमध्ये स्वत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन करत रस्त्यांवर वर्तुळ काढताना दिसल्या. दुसऱ्या प्रतिमेत बागेत मोराला दाणे देणारा नेता दिसला, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. केंद्र सरकारने टाळेबंदीलाच लस मानल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांनी केली.

वेळेवरून संताप..

करोनावरील चर्चेच्या नियोजित वेळेवरूनही विरोधक आक्रमक झाले. उपसभापती हरिवंश यांनी मंत्र्यांच्या उत्तरासह अडीच तासांचा वेळ असल्याचे सांगताच काँग्रेससह विरोधी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे जयराम रमेश, डेरेक ओब्रायन आदींनी सभापतींच्या चेंबरमध्ये जाऊन व्यंकय्या नायडूंशी चर्चा केली. त्यानंतर नायडू यांनी सभागृहात येऊन चर्चेचा कालावधी चार तासांचा केला. बुधवारी दोन तास चर्चा  झाली असून आरोग्यमंत्री गुरुवारी उत्तर देतील. चर्चेच्या वेळेवरून सदस्य संतप्त झाले आहेत त्यावरून हा प्रश्न किती गंभीर आहे हे समजते, असे तेलंगणा राष्ट्र समितीचे के. केशव राव म्हणाले. समाजवादी पक्षाचे रवीप्रकाश वर्मा यांनी, करोना काळातील आत्महत्यांच्या समस्येबाबत केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका केली.