पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू वादात सापडले आहेत. सोमवारी सिद्धूने दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निर्णयाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. १९९९ साली अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये कोणी मसूह अजहरची सुटका केली? असा सवाल सिद्धूने पत्रकारांशी बोलताना विचारला.

१९९९ साली जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी आयसी ८१४ विमानाचे अपहरण करुन ते विमान कंदहारला घेऊन गेले होते. त्यावेळी केंद्रात भाजपाचे सरकार होते. तत्कालिन वाजपेयी सरकारने १८० प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय तुरुंगात बंद असलेला जैशचा म्होरक्या मसूद अजहरची सुटका करण्याचा निर्णय घेतला. याच अजहरच्या दहशतवादी संघटनेने १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले.

पुलवामा हल्ल्यानंतर काही जणांच्या कृत्यासाठी तुम्ही संपूर्ण देशाला जबाबदार धरणार का ? असा सवाल सिद्धू यांनी विचारला होता. त्याच वक्तव्यावरुन सिद्धू यांच्यावर चौफर टीका सुरु आहे. सोमवारी सकाळी पंजाब विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या आमदारांनी त्यांना प्रखर विरोध केला. त्यामुळे सिद्धू यांचा पारा चढला व अकाली दलाचे आमदार बिक्रम सिंग मजिठिया यांच्याबरोबर त्यांची शाब्दीक वादावादीही झाली.

सिद्धू यांना मंत्रीपदावरुन हटवण्यात यावे अशी अकाली दलाच्या आमदारांची मागणी आहे. सिद्धू यांची कपिल शर्माच्या शो मधूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. पंजाब विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मजिठिया यांच्या नेतृत्वाखाली अकाली नेत्यांनी सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीचे फोटो जाळले.