केंद्रात कोणाचेही सरकार असो लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) राम मंदिर उभारणीस सुरूवात करेल, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) लोकसभा निवडणुकीपर्यंत राम मंदिर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली होती.

उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे आयोजित संघाच्या कार्यक्रमादरम्यान भागवत यांनी राम मंदिर, धार्मिक भेदभाव आणि जातीय आरक्षणासंबंधी अनेक मुद्यांवरील प्रश्नांची उत्तरे दिली. नुकताच कुंभ मेळ्यात झालेल्या धर्म संसदेनुसारच मंदिराची उभारणी केली जाईल, असे भागवत यांनी सांगितले.

संघाच्या एका नेत्याने भागवत यांनी या कार्यक्रमात बोललेल्या विविध मुद्यांची माहिती दिली. भागवत यांनी राम मंदिर निर्मितीची तारीख सांगितली नाही. पण हे स्पष्ट केले की, राम मंदिर आणि गोरक्षा हे हिंदू संस्कृतीचा आधार असून ते अत्यंत महत्वपूर्ण आहे.