कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर चीनच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. यानंतर काँग्रेसनं यावर प्रतिक्रिया देत स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी चीनचे नाव का घेतले नाही असा सवाल केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते यांनी रणदीप सुरजेवाला त्यांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “सर्व भारतीयांनी या स्वातंत्र्यदिनी देशाच्या रक्षणासाठी आणि भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैन्याला परतवण्यासाठी सरकार काय करत आहे असा सवाल केला पाहिजे. लाल किल्ल्यावरील भाषणातून पंतप्रधान LOC ते LAC पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांना भारतीय सैनिकांनी योग्य उत्तर दिले असे म्हणाले. मात्र त्यांनी चीनचे नाव घेतले नाही,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘LAC असो किंवा LOC’ या वक्तव्यावर काँग्रेस म्हणाली, “नुसतं बोलणंच…”

“कॉंग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि १३० कोटी भारतीयांना आपल्या सैन्याचा अभिमान आहे आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वासही आहे. प्रत्येक वेळी चीनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलेल्या प्रत्येक भारतीय सैनिकांना आम्ही नमन करतो,” असे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. “पण सत्तेत बसलेल्यांचे काय?  ते चीनच्या नाव घेण्यास का घाबरत आहेत,” असा सवाल सुरजेवाला यांनी केला.

आणखी वाचा- ‘आमचे जवान काय करु शकतात, ते संपूर्ण जगाने लडाखमध्ये पाहिले’

चिनी सैनिकांनी जेव्हा भारतीय हद्दीत घुसखोरी केली तेव्हा देशाचे संरक्षण करण्यासाठी सरकारने काय केले असा प्रश्न प्रत्येक भारतीयाने आजच्या स्वातंत्र्य दिनी विचारला पाहिजे. हिच खरी लोकशाही आहे. आपल्या सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे का? आपलं सरकार लोकांची मतं जाणून घेतं का? आपल्याला बोलण्याचे, प्रवास करण्याचे, विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे का? असंही सवाल त्यांनी यावेळी केले.