भारतीय बँकांना हजारो कोटींना बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावीद यांनी मंजुरी दिली आहे. हे मोदी सरकार आणि सीबीआयचे मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, विजय मल्ल्याने ट्विट करत ब्रिटन सरकारच्या आदेशाविरोधात अपील करणार असल्याचे सांगितले आहे.

ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावीद यांच्याकडून प्रत्यार्पणास मंजुरी मिळाल्यानंतर विजय मल्ल्याने ट्विट केले आहे. वेस्ट मिनिस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाकडून १० डिसेंबर २०१८ दिलेल्या निर्णयाविरोधात मी अपील करण्याचे ठरवले होते. मला गृह सचिवांच्या निर्णयापूर्वी अपिलाची प्रक्रिया सुरू करता आली नाही. आता मी अपिलाची प्रक्रिया सुरू करेन, असे विजय मल्ल्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

फसवणुकीचा कट रचणे आणि मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिल्याचे ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने सोमवारी सांगितले. लंडनच्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयाने १० डिसेंबर २०१८ ला ६३ वर्षीय मल्ल्याला भारतीय न्यायालयांना उत्तर द्यावे लागेल, असे म्हटले होते.

मल्ल्याला आता ब्रिटनच्या उच्च न्यायालयात अपील करण्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल करण्याची ४ फेब्रुवारीपासून १४ दिवसांची मुदत असेल. जर अपिलास मंजुरी देण्यात आली तर मल्ल्याच्या खटल्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होईल. बँकांना हजारो कोटींचा चुना लावल्याचा आरोप असलेल्या मल्ल्याला फरार घोषित करण्यात आले आहे. त्याला भारतात आणण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते.