शहरीबरोबरच ग्रामीण भागातील प्रवासी सेवांवर परिणामाची शक्यता
एसटी महामंडळाचे एप्रिल महिन्यातील गर्दीचे नियोजन लोकसभा निवडणुकीमुळे बिघडते की काय असाच प्रश्न आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होत असून त्या-त्या भागात विविध सरकारी कामांसाठी १० हजार बस आरक्षित झाल्या आहेत. निवडणूक काळात तीन ते चार दिवस बस गाडय़ा व्यस्त राहणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासाचे नियोजनही बिघडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका होत असून पहिला टप्पा ११ एप्रिल, दुसरा टप्पा १८, तिसरा टप्पा २३ आणि चौथा टप्पा २९ एप्रिल रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशिमसह अन्य काही भागात, तर शेवटच्या टप्प्यातील मतदान मुंबई, ठाणे,कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, धुळेसह काही भागात होईल. राज्यात चार टप्प्यातील निवडणुकीच्या कामांसाठी एसटी महामंडळाच्या जवळपास १० हजार बस गाडय़ा टप्प्याटप्यात व्यस्त राहणार आहेत. मतदानाच्या आधी, मतदान दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असे तीन ते चार दिवस निवडणुकीच्या कामासाठी त्या-त्या भागात बस गाडय़ा सेवेत असतील.
मतपेटय़ा, कर्मचारी, पोलीस यांची ने-आण करण्याचे काम या बसमार्फत होईल. मात्र ही कामे होताना शहरी व ग्रामिण भागांतील प्रवासी सेवेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
निवडणूक काळात मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी प्रवासी प्रवास करत नाही, त्यामुळे एसटी प्रवाशांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचा दावा महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र असे असले तरी एसटी महामंडळाचा १३ एप्रिलपासून जूनपर्यंत गर्दीचा काळही सुरू
होतो. शाळा, महाविद्यालयांना असलेल्या सुट्टय़ांमुळे या काळात महामंडळातर्फे जादा गाडय़ा सोडण्यात येतात. परंतु निवडणुकीसाठी गाडय़ा तसेच नियमितबरोबरच जादा वाहतुकीसाठी बस गाडय़ा उपलब्ध करण्याचे नियोजन करताना एसटी अधिकाऱ्यांची भंबेरी उडत आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्याच्या घडीला १८ हजार बस गाडय़ा आहेत.