नवी दिल्ली : पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किमान १०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिली. ही लष्करी कारवाई अजूनही सुरू असल्याने त्याचा तपशील उघड करणे योग्य नसल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षांना पाकिस्तान व दहशतवादाविरोधातील या लढाईत केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचे, या मुद्द्यावरून राजकारण न करण्याचे आवाहनही सिंह यांनी केले. या आवाहनाला सर्व विरोधी पक्षांनीही अनुकूलता व्यक्त केली.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना भारताच्या लष्कर व हवाई दलाने मंगळवारी रात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या या लष्करी कारवाईची सविस्तर माहिती गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीमध्ये देण्यात आली.
बैठकीमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजनाथ सिंह यांना ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले होते. काही खासदारांनी पाकिस्तानविरोधात आगामी लष्करी कारवाई कशी असेल, याबाबतही माहिती विचारली होती. मात्र, सीमेवर पाकिस्तानविरोधात संघर्ष सुरू असून ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही संपलेले नाही. त्यामुळे अधिक तपशील देता येणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी विरोधी खासदारांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, ‘आम्ही केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे, असे खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. तर देशातील सर्व राजकीय पक्ष केंद्र सरकारच्या पाठीशी आहेत. ते एकसुरात बोलत आहेत ही चांगली बाब आहे, असे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
पाकिस्तानने यापुढे पुन्हा कुरापती केल्या तर त्यालाही सडेतोड लष्करी प्रत्युत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. या बैठकीमध्ये सर्व खासदारांनी केंद्र सरकारच्या लष्करी कारवाईला पाठिंबा दिला. बैठकीला केंद्रीयमंत्री अमित शहा, एस. जयशंकर, निर्मला सीतारामन, जे. पी. नड्डा, किरेन रिजिजू आदी उपस्थित होते. तर, विरोधी नेत्यांमध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, रामगोपाल वर्मा, सुदीप बंडोपाध्याय, टी. आर. बालू, सुप्रिया सुळे, संजय राऊत, संजय सिंह, असदुद्दीन ओवैसी, सस्मित पात्रा आदींचा सहभाग होता.
सरकारने विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे. कारवाईबाबत काही गोष्टींवर सार्वजनिक चर्चा करणे अयोग्य आहे. सर्वांनी सरकारला फक्त पाठिंबा दिला आहे. सीमावर्ती भागात लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व पावले उचलली जातील, अशी माहिती सरकारने दिली. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
पंतप्रधानांची पुन्हा अनुपस्थिती
सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले नसले तरी, या लढाईमध्ये प्रत्येक नागरिकाने एकत्र राहण्याची गरज असल्याचा पंतप्रधान मोदी यांचा संदेश बैठकीमध्ये देण्यात आला. सलग दुसऱ्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित न राहिल्याबद्दल विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली.
मोदी संसदेपेक्षा मोठे आहेत का?: खरगे
सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित न राहिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी नाराजी व्यक्त केली. मोदी स्वत:ला संसदेपेक्षा मोठे मानत असावेत. पण, वेळ येईल तेव्हा या मुद्द्यावर बोलू. आता संकटाच्या क्षणी आम्ही सगळे लष्कराच्या मागे उभे आहोत. केंद्र सरकारकडून ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात आम्हाला काही गोपनीय माहिती देण्यात आली असली तरी त्याबाबत अधिक बोलणे उचित ठरणार नाही, असेही खरगे म्हणाले.