लॉस एंजेलिस : येथील एका उद्यानात रविवारी दुपारी एका ‘कार शो’दरम्यान अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार व पाच जण जखमी झाले. ही घटना दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी लॉस एंजेलिसजवळच्या सॅन प्रेडो येथील पेक पार्क येथे घडली. या घटनेमागील हेतू पोलिसांना अद्याप समजू शकलेला नाही. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

लॉस एंजेलिस पोलीस दलाचे (एलएपीडी) कॅप्टन केली मुनिझ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की या घटनेतील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पेक पार्क येथील बेसबॉल मैदानावर (बेसबॉल डायमंड)  गोळीबारात जखमी होऊन अनेक जण पडल्याची माहिती दूरध्वनीवरून समजली. हा परिसर जखमींना रुग्णालयात पोहोचवून हा परिसर पुरावे व तपासासाठी रिकामा केला आहे. 

या घटनेत किती जणांनी गोळीबार केला हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेत चार पुरूष व तीन महिला अशा सात व्यक्ती जखमी झाल्यात. त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.