Tahawwur Rana Extradition: मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील एक आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याला अमेरिकी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. त्याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून प्रत्यार्पणावर तातडीने स्थगिती मिळावी, अशी याचिका केली आहे.

तहव्वूर राणाने याचिकेत म्हटले की, भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर तेथील तुरूंगात माझा छळ केला जाऊ शकतो. मी पाकिस्तानी मुस्लीम असल्यामुळे माझ्यावर अन्याय होऊ शकतो. यातून कदाचित मी मरूही शकतो. जर प्रत्यार्पणाला स्थगिती दिली गेली नाही, तर अमेरिकेचे न्यायालय आपले अधिकार क्षेत्र गमावून बसेल.

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ट्रम्प म्हणाले, “आम्ही अतिशय हिंसक माणूस (तहव्वुर राणा) भारताच्या ताब्यात देत आहोत. याबद्दल आमच्याकडे अनेकदा विनंत्या आल्या होत्या. गुन्ह्यांबाबत दोन्ही देश समन्वयाने काम करतील. गुन्ह्यांच्या बाबतीत भारताला सहकार्य करणारे निर्णय घेऊ.” डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेण्याआधी २१ जानेवारी रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वुर राणाची याचिका फेटाळून लावली होती.

प्रकृतीचे कारण केले पुढे

दहशतवादी तहव्वुर राणाने आपल्या याचिकेत प्रकृती खालावल्याचे सांगितले. पोटाच्या विकारासह त्याला पार्किंसंस आजार असल्याचे राणाने सांगितले. यामुळे तो अनेक गोष्टी विसरतो. तसेच मूत्राशयाचा कर्करोग होण्याचेही संकेत मिळाले असल्याचे त्याने सांगितले. माझ्या पाकिस्तानी असण्यामुळे माझ्याविरोधात शत्रूत्वाची भावना ठेवली जाईल, अशा देशात मला पाठवू नका, अशी विनंती तहव्वुर राणाने याचिकेत केली आहे.

तहव्वूर राणाचा खटला दिल्लीत होणार?

दिल्लीतील न्यायालयाने तहव्वुर राणा याच्यावरील सर्व खटल्याच्या नोंदी मुंबई न्यायालयाकडून मागवल्या आहेत. भारतात एकीकडे राणाच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू असतानाच पटियाला हाऊस न्यायालयाने राणावरील न्यायालयीन खटल्याच्या नोंदी मागवल्या आहेत. या हल्ल्यासंबंधित अनेक खटले दोन्ही राज्यांमध्ये सुनावणीसाठी असल्याचे सांगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा न्यायाधीश विमल कुमार यादव यांनी मुंबई न्यायालयाला खटल्याच्या सर्व नोंदी देण्याचे निर्देश दिले आहेत. खटल्यासंदर्भातील नोंदी मिळवण्यासाठीची याचिका एनआयएने दाखल केल्यानंतर हे निर्देश देण्यात आले होते.