2G Spectrum Scam Verdict: टू जी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा, डीएमके नेत्या आणि खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले. न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

काँग्रेसप्रणित ‘यूपीए २’ च्या कार्यकाळात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाला होता. या घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते, असा निष्कर्ष ‘कॅग’ च्या अहवालामध्ये काढण्यात आला होता. या घोटाळ्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला होता. स्पेक्ट्रम वाटपासंबंधीच्या ७ जानेवारी २००८ च्या प्रसिद्धी अधिसूचनेत ए. राजा यांनी फेरफार केल्याचा ठपका संयुक्त संसदीय समितीच्या अहवालात ठेवण्यात आला होता. २०११ मध्ये या घोटाळ्याची दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु झाली. या प्रकरणात न्यायालयाने ए राजा, कनिमोळी यांच्यासह १७ जणांवर आरोप निश्चित केले होते. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.

गुरुवारी सकाळी ए. राजा आणि कनिमोळी हे सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचले. न्यायालय काय निर्णय देणार याकडे देशभराचे लक्ष लागले आहे. या घोटाळ्यामुळे काँग्रेसवर देशभरात टीका झाली होती. गुरुवारी सकाळी न्यायालयाने याप्रकरणात निकाल दिला. आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर करता न आल्याने न्यायालयाने सर्व १७ आरोपींना दोषमुक्त केले, अशी माहिती स्वान टेलिकॉमचे वकील विजय अग्रवाल यांनी दिली. न्यायालयाच्या निकालानंतर ए राजा समर्थकांनी न्यायालयाबाहेर जल्लोष केला.