कोलकाता : बीरभूम येथील जळितकांडावरून जोरदार वादावादी झाल्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सोमवारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्या आमदारांच्या गुद्दागुद्दीने सांगता झाली. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्यासह भाजपच्या ५ आमदारांना निलंबित केले. अधिकारी यांनी एका प्रतिस्पर्धी आमदाराचे नाक फोडल्याचा  आरोप आहे.

सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजपचे आमदार हौद्यात उतरले आणि बीरभूम जिल्ह्यात गेल्या आठवडय़ात आठ जणांना जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवेदन करावे अशी त्यांनी मागणी केली.

अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी भाजपच्या आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी सभागृहात घोषणा सुरूच ठेवल्या. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले व त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

तृणमूलच्या आमदारांनी भाजपच्या आमदारांना मारहाण केल्याचा दावा करून अधिकारी नंतर सभागृहाबाहेर निघून गेले.

या गुद्दागुद्दीत तृणमूलचे आमदार असित मजुमदार व भाजपचे मुख्य प्रतोद मनोज तिग्गा हे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अधिकारी यांनी आपल्या नाकावर ठोसा मारल्याचा दावा मजुमदार यांनी केला, मात्र अधिकारी यांनी तो फेटाळला.

यानंतर अध्यक्षांनी अधिकारी यांच्यासह भाजपच्या दीपक बर्मन, शंकर घोष, मनोज तिग्गा व नरहरी महातो या आमदारांना संपूर्ण सत्रासाठी निलंबित करून अधिवेशन संस्थगित केले.

आमदार विधानसभेतही सुरक्षित नाहीत. कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करावे अशी मागणी आम्ही केल्यामुळे, मुख्य प्रतोद मनोज तिग्गा यांच्यासह आमच्या किमान ८ ते १० आमदारांना तृणमूलच्या काही आमदारांनी मारहाण केली.                   

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-शुभेंदु अधिकारी, विरोधी पक्षनेते