शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड उसंडीमुळे उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा एकूण संपतीच्या बाबतीत मुकेश अंबानींच्या जवळ पोहोचले आहेत. यावर्षी अदानींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ज्या वेगाने अदानींची संपत्ती वाढत आहे, तो वेग पाहता ते लवकरच मुकेश अंबानींची बरोबरी करतील, असं म्हटलं जातंय. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, २०२१ मध्ये ५८ वर्षीय उद्योगपती अदानींच्या एकूण संपत्तीत ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

अदानींची संपत्ती ५० अब्ज डॉलर्सने वाढली आहे, तर मुकेश अंबानींची संपत्ती २१.८ अब्ज डॉलरने वाढली आहे. अंबानी पेक्षा अदानींच्या संपत्तीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अदानी हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. जगात एकूण संपत्तीच्या बाबतीत सध्या टेस्लाचे सीईओ एलोन मस्क आघाडीवर आहेत. फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय या यादीत मुकेश अंबानी ११व्या क्रमांकावर आहेत. तर अदानी १३व्या क्रमांकावर आहेत.

अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी हे भारतातील सर्वात मोठे थर्मल कोळसा उत्पादक आणि कोळसा व्यापारी तसेच देशातील सर्वात मोठे पोर्ट ऑपरेटर आहेत. अदानीच्या शेअर बाजारात सध्या सहा कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय अदानी समूह आपल्या सातव्या कंपनीचा IPO लाँच करण्याचा विचार करत आहे. गेल्या दोन आठवड्यात अदानी एंटरप्रायझेससे शेअर २१ टक्क्यांनी वाढले आहेत.