सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या वकील रेणू सिन्हा यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी २४ तास आपल्याच बंगल्यात लपून बसलेल्या सिन्हा यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ६१ वर्षीय वकील रेणू सिन्हा यांचा मृतदेह रविवारी संध्याकाळी त्यांच्याच बंगल्याच्या बाथरूममध्ये आढळला होता. त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत होता. त्यामुळेच हे प्रकरण खुनाचं आहे हा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता. आता या प्रकरणात त्यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी रेणू सिन्हा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रेणू सिन्हा यांच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस घटना स्थळी आले. त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना आत रेणू यांचा मृतदेह पडल्याचं आढळलं. रेणू सिन्हा यांच्या भावासह कुटुंबाने त्यांच्या पतीनेच ही हत्या केली असावी हा संशय व्यक्त केला होता. रेणू सिन्हा यांचा मृतदेह जेव्हा सापडला तेव्हा त्यांचे पती घरातून बेपत्ता झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रेणू सिन्हा यांच्या पतीला त्यांच्या घरातूनच अटक केली. हत्येनंतर रेणू सिन्हा यांचा पती बंगल्याच्या स्टोअर रूममध्ये लपला होता. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. नितीन सिन्हा असं रेणू सिन्हा यांच्या पतीचं नाव आहे. पोलिसांनी नितीनला अटक केली आहे.

नितीन सिन्हाला बंगला विकून विदेशात जायचं होतं

रेणू सिन्हा यांचा पती नितीन सिन्हाला बंगला विकून परदेशात जायचं होतं. रेणू सिन्हा यांची हत्या करण्याआधी नितीनने ब्रिटिश पासपोर्टही तयार केला होता. रेणू यांना मात्र हा बंगला विकायचा नव्हता, त्या बंगला विकण्यासाठी विरोध दर्शवत असल्याने नितीनने त्यांचा काटा काढला. रेणू सिन्हा यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचीही तयारी त्यांच्या पतीने केली होती. पोलीस जेव्हा बंगल्यावर पोहचले तोपर्यंत नितीनने बरेच पुरावेही मिटवले होते. मात्र सगळे पुरावे मिटवण्याआधीच पोलीस तिथे पोहचले. पहाटे तीनच्या सुमारास नितीनला अटक करण्यात आल्यानंतर त्याने सगळी हकीकत पोलिसांना सांगितली.

बंगल्यात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करणाऱ्या रेणू सिन्हा या पाटण्याच्या होत्या. त्या पतीसह नोएडातील सेक्टर ३० मध्ये राहात होत्या. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो. तसंच त्यांना कर्करोगानेही ग्रासलं होतं. दोन दिवसांपासून रेणू यांचा भाऊ त्यांना फोन करत होता, मात्र रेणू फोन उचलत नव्हत्या, त्यामुळे रेणू सिन्हा यांच्या भावाने पोलिसांना याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तिथे त्यांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात त्यांना रेणू यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या अंगावर अनेक जखमाही झाल्या होत्या. आज तकनेही हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला मात्र सीसीटीव्हीचा डिव्हीआर गायब होता. त्यानंतर नितीन सिन्हानेच त्यांच्या पत्नीला म्हणजेच रेणू यांना ठार केलं असावं असा संशय बळावला. पोलिसांनी बराच शोध घेतला, आसपासच्या भागात असलेले सीसीटीव्हीही तपासले पण त्यांना नितीन कुठेच दिसला नाही. तो घरातच लपला आहे का? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी घरही धुंडाळलं. पण नितीन तिथे नव्हता. तो घराच्या स्टोअर रुममध्ये लपला होता. त्याला पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास अटक केली.