Karnataka : कर्नाटकमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण दोन दिवसांपूर्वी नाश्त्यासाठी आठवीच्या एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता बेकरीमध्ये जाऊन एका व्यक्तीची ७ जणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
कर्नाटकमधील कोप्पल शहरात संपत्तीच्या वादामधून एका बेकरीच्या दुकानात सात जणांनी एका व्यक्तीची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना ३१ मे रोजी घडली. एका बेकरीच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये चेनाप्पा नारिनल असं नाव असलेला एक पीडित व्यक्ती मोठ्या आवाजात ओरडत असल्याचं दिसत असून तो पळत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी त्याला काही लोक मारहाण करत असल्याचं दिसत आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
यावेली त्याच्यावर दोन जण चाकूने हल्ला करत असून एकाने लाकडी काठीने त्याच्या डोक्यावर वार केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पीडित व्यक्ती हल्ल्यापासून वाचण्यासाठी मदत मागत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्याच्या मदतीला कोणीही धावलं नाही. यावेळी हा व्यक्ती जीव वाचवा म्हणून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मात्र, त्याचवेळी दोन ते तीन जणांनी त्याच्यावर चाकूने वार केले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये रवी, प्रदीप, मंजुनाथ, नागराज, गौतम आणि प्रमोद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान,या घटनेच्या प्राथमिक चौकशीत असं आढळून आलं आहे की जुने वैमनस्य आणि मालमत्तेच्या वादामधून ही घटना घडल्याचं संशय आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेत आणखी कोण-कोण सहभागी होतं का? याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.