नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या #MeToo मोहिमेअंतर्गत बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने मोठा निर्णय घेतला आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेल्या एका दिग्दर्शकाच्या चित्रपटातून आमिर खानने काढता पाय घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने स्वतः याबाबत माहिती दिली.

आमिर खानने त्याची पत्नी किरण राव आणि स्वतःच्या वतीने एक पत्रक काढून याबाबत माहिती दिली. आम्ही ज्या व्यक्तीसोबत चित्रपट करणार होतो त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत असं आम्हाला समजलं. त्याबाबत आम्ही चौकशी केली असता, लैंगिक छळाबाबतचं ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मिळाली. अद्याप त्या प्रकरणाचा निकाल आलेला नाही, त्यामुळे या चित्रपटातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. आम्ही नेहमीच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला आहे, सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यात आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा निषेध करतो आणि अशा प्रकरणांमध्ये खोट्या आरोप करणाऱ्यांचीही निंदा करतो, असं आमिर खानने म्हटलं आहे. या पत्रकामध्ये आमिर खानने कुठेही त्या दिग्दर्शकाच्या नावाचा खुलासा केलेला नाही. मात्र 2004 मध्ये एका दिग्दर्शकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, या व्हिडीओत एक मॉडेल त्या दिग्दर्शकाच्या थोबाडीत लगावताना दिसत होती. दिग्दर्शकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप त्या मॉडेलने केला होता, त्याच्याबाबतीत आमिर खानने हे पत्रक काढल्याची चर्चा आहे.

आमिर खान सध्या यशराज बॅनरचा चित्रपट ‘ठग्स ऑफ़ हिंदोस्तान’ च्या प्रदर्शनाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये अमिताभ बच्चन, कटरीना कैफ आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत आहेत.