CM Bhagwant Mann: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असताना राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यमुना नदीच्या अस्वच्छ पाण्यावरून शेजारचे हरियाणा राज्य या निवडणुकीत ओढले गेले असताना आत पंजाबलाही यात ओढले गेले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते भगवंत मान यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी निवडणूक आयोगाने धाड टाकली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही आपली बाजू मांडली आहे. पैसे वाटल्याचा आरोप झाल्यामुळे भरारी पथकाने कपूरथाला निवासस्थानी धडक दिली होती. मात्र त्यांना घरात येऊ दिले नाही.

निवडणूक अधिकारी ओ. पी. पांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, इथून पैसे वाटप होत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. १०० मिनिटांच्या आत आम्हाला तक्रारीचे निवारण करायचे असते. आयोगाचे भरारी पथक येथे तपासणीसाठी आले होते. मात्र त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यामुळेच मला यावे लागले. भरारी पथकाला कॅमेऱ्यांसह आत जाऊ द्यावे, अशी विनंती आम्ही केली आहे.

सीव्हीजील ॲपवरून तक्रार प्राप्त झाल्याचेही पांडे यांनी म्हटले. निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतर आता ‘आप’कडून जोरदार पलटवार करण्यात येत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपाचे नेते पैसे आणि भेटवस्तू मतदारांना वाटत असताना त्यांना मोकळे सोडून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर धाड टाकण्याचे कारण काय? हे मला समजत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही एक्सवर पोस्ट टाकत या घटनेचा निषेध केला आहे. “दिल्ली पोलिसांच्या समवेत निवडणूक आयोगाने माझ्या दिल्लीतील निवासस्थानी धाड टाकली. दिल्लीत भाजपाचे नेते राजरोस पैसे वाटप करत आहेत. पण हे पोलीस आणि निवडणूक आयोगाला दिसत नाही. पण आमच्यावर मात्र कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाच्या इशाऱ्यावर दिल्ली पोलीस आणि आयोग पंजाबींना बदनाम करत आहे, हे निषेधार्ह आहे”, अशी टीका भगवंत मान यांनी केली.