मणिपूर या ठिकाणी दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना मे महिन्यात घडली आहे. या घटनेचा देशभरात निषेध केला जातो आहे. जमावाकडून दोन महिलांना पकडण्यात आलं. त्यानंतर त्यांना विवस्त्र करुन त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरात या घटनेचा निषेध होतो आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या प्रकरणातल्या नराधमांना फाशी द्या अशी मागणी केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा- मणिपूर हिंसाचार : कुकी आणि मैतेई हे समाज नेमके कोण आहेत ?

काय म्हणाले अण्णा हजारे?

” मणिपूरमध्ये महिलांवर जो अन्याय आणि अत्याचार झाला आणि तो ज्यांनी केला त्या नराधमांना फाशी द्या. स्त्री आपल्या आई प्रमाणे, बहिणीप्रमाणे असते. एक घटना अशीही घडली आहे की एका माजी सैनिकाच्या पत्नीवरही अत्याचार झाला आहे ही बाबही गंभीर आहे. आपल्या रक्षणासाठी तो सैनिक सीमेवर लढत होता. त्याच्या पत्नीवर असा अन्याय होणं दुर्दैवी आहे. मणिपूरची घटना हा माणुसकीवर लागलेला कलंक आहे.”

महिलांची निर्वस्त्र धिंड आणि लैंगिक अत्याचार

बुधवारी रात्री (१९ जुलै) सोशल मीडियावर मणिपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला; ज्यामध्ये पुरुषांचा एक मोठा गट दोन महिलांची रस्त्यावरून निर्वस्त्र धिंड काढत असल्याचे दिसत होते. त्यानंतर या महिलांना एका शेताच्या दिशेने घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्या ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. ही घटना ४ मे रोजी थौबल जिल्ह्यात घडली असून, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. १८ मे रोजी खांगपोकी जिल्ह्यात पोलिसांनी शून्य एफआयआर (शून्य एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली, ते सोडून दुसरीकडे एफआयआर दाखल करणे) दाखल केला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, या अमानवी गुन्ह्याला दोन महिने उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- “संघ परिवाराच्या अजेंड्यामुळे मणिपूरचं दंगलग्रस्त भूमीत रुपांतर”, केरळच्या मुख्यमंत्र्याकडून हल्लाबोल!

ज्या दोन महिलांवर अत्याचार करून, त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, त्या महिला कुकी-झोमी समुदायाच्या असल्याचे सांगण्यात येते. खांगपोकी या डोंगराळ जिल्ह्यात या समुदायाचे प्राबल्य आहे. दोन महिलांपैकी एकीचे वय २०; तर दुसरीचे वय ४० असल्याचे कळते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ अत्यंत विदारक परिस्थिती विशद करणारा असून, या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पुरुषांचा जमाव या महिलांना बळजबरीने शेतात नेत असताना त्यांच्या शरीराची विटंबना करताना दिसत आहेत.