अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. एका कॉम्प्लेक्समध्ये झालेला हा स्फोट कारमध्ये करण्यात आला. याआधी सुरुवातील गोळीबार करण्यात आला अशी माहिती मिळत आहे. या बॉम्बस्फोटामुळे जवळच असणाऱ्या युद्ध संग्रहालयाचं आणि टीव्ही स्टेशनचं नुकसान झालं आहे. बॉम्बस्फोट इतका जबरदस्त होता की, जवळ असणाऱ्या इमारतींना हादरा बसला होता.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात ६३ नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा सुरक्षा जवानांचा समावेश असून त्यांच्यातील २० जण जखमी आहेत. या बॉम्बस्फोटात काही लहान मुलांचाही मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ही मुलं संग्रहालयात आली होती की, बॉम्बस्फोटाच्या हादऱ्याने पडलेल्या शाळेत होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

बॉम्बस्फोट केल्यानंतर हल्लेखोर जवळच्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीत लपले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत अशी माहिती सार्वजनिक मंत्रालयाने दिली आहे.

तालिबानच्या दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून आपण सुरक्षा मंत्रालयाच्या तांत्रिक स्थापनेवर हल्ला करत होतो असा दावा केला आहे. काबूलमध्ये आयएस आणि तालिबान दोन्ही संघटना सक्रीय आहेत. अमेरिका आणि तालिबानने शांततेच्या चर्चेसाठी सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच हा हल्ला झाला आहे.