बिहारच्या बक्सरमध्ये चौथा शहराता गंगा नदीच्या कीनाऱ्यावर सुमारे १०० मृतदेह आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश मधून वाहून आल्याची शक्यता वर्तवली होती. या घटनेवरून बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान बिहारच्या बक्सरनंतर उत्तर प्रदेशातील गाझीपुरातील गंगेच्या काठी मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. हे मृतदेह करोना बाधितांचे असल्याची शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे.
गाझीपूरमधील गंगेच्या किनाऱ्यावर काही मृतदेह आढळले. गाझीपूर ते बक्सर दरम्यान सुमारे 55 किलोमीटर अंतर आहे. यापुर्वी बक्सरमध्ये सोमवारी सुमारे १०० मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले होते. त्यानंतर हे मृतदेह उत्तर प्रदेशातून आले असल्याचे बिहारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या मते बिहारमध्ये मृतदेह पाण्यात सोडण्याची परंपरा नाही. उत्तर भारतातील ग्रामीण भागात करोना संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे हे कोविड रुग्णांचे मृतदेह असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
उत्तर प्रदेश मध्ये करोना रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी मृतदेह नदीत सोडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतदेह नदीत सोडल्याने दूषित पाण्यामुळे करोना संक्रमण अधिक वेगाने पसरण्याची भीती स्थानिकांना आहे. या प्रकरणाची अधिकारी चौकशी करत आहेत. वृत्तसंस्था एएनआयशी बोलतानां गाझीपूरचे जिल्हा दंडाधिकारी एमपी सिंग म्हणाले की, “या प्रकरणाची माहिती मिळताच अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. हे मृतदेह कोठून आले आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे.”
तसेच स्थानिक लोकांनी असा आरोप केला आहे की, आम्ही दुर्गंधीबद्दल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली पण कोणतीही कार्यवाही झाली नाही. स्थानिक रहिवासी अखंड यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “आम्ही अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली पण कोणतीही कार्यवाही झाली नाही. जर परिस्थिती सारखीच असेल तर आम्हाला भीती आहे की, लवकरचं आम्ही देखील करोना संसर्गाच्या तावडीत सापडू.”