Israel Attacks Iran Latest Updates : इस्रायलने शुक्रवारी (१३ जून) इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने त्यांची एअरस्पेस बंद केली आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या एअरस्पेसमधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची एअरस्पेस बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. एअर इंडियाने म्हटलं आहे की मुंबई-लंडन, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क विमानांना मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, एअर इंडियाने समाजमाध्यमांद्वारे त्यांची काही विमानं वळवण्यात आल्याची व काही विमानं परतल्याची माहिती दिली आहे. एअर इंडियाने म्हटलं आहे की “प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या प्रवाशांच्या सोयीसाठी रिफंड (तिकीटाचे पैसे परत देणे) व रीशेड्यूलेशन (काही वेळाने इतर विमान उड्डाणे निश्चित करणे) प्रक्रिया सुरू करत आहोत. तसेच आम्ही प्रवाशांना पर्यायी विमानं उपलब्ध करून देत आहोत.
या विमानांचा मार्ग बदलला
- AI130 – लंडन हीथ्रो- मुंबई हे विमा व्हिएन्नाच्या दिशेने वळवण्यात आलं.
- AI102 – न्यूयॉर्क-दिल्ली हे विमान शारजाहच्या दिशेने वळवण्यात आलं.
- AI116 – न्यूयॉर्क-मुंबई हे विमान जेद्दाहच्या दिशेने वळवण्यात आलं.
- AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली हे विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आलं आहे. हे विमान मुंबई विमानतळावर उतरवून लंडनसाठी रवाने केलं जाणार आहे.
- AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो हे विमान माघारी बोलावलं आहे.
- AI119 – मुंबई-न्यूयॉर्क हे विमान देखील परतलं आहे.
- AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन हे विमानही परतलं आहे.
- AI106 – न्यूयॉर्क-दिल्ली विमान न्यूयॉर्कला परतलं आहे.
- AI188 – व्हँकूवर-दिल्ली – हे विमान जेद्दाह शहराच्या दिशेने वळवण्यात आलं आहे.
- AI101 – दिल्ली-न्यूयॉर्क हे विमान फ्रँकफर्ट/मिलानच्या दिशेने वळवण्यात आलं आहे.
- AI126 – शिकागो-दिल्ली हे विमान जेद्दाह शहराच्या दिशेने वळवण्यात आलं आहे.
- AI132 – लंडन हीथ्रो-बंगळुरू हे विमान शारजाहच्या दिशेने वळवण्यात आलं आहे.
- AI2016 – लंडन हीथ्रो-दिल्ली हे विमान व्हिएन्नाच्या दिशेने वळवण्यात आलं आहे.
- AI104 – वॉशिंगटन-दिल्ली हे विमानदेखील व्हिएन्नाच्या दिशेने वळवण्यात आलं आहे.
- AI190 – टोरंटो-दिल्ली हे विमान फ्रँकफर्टच्या दिशेने वळवण्यात आलं आहे.
- AI189 – दिल्ली-टोरंटो हे विमान दिल्लीला परतलं आहे.
इस्रायलचं ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू
इस्रायलने शुक्रवारी पहाटने तेहरानमधील अनेक इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. इस्रायली हवाई दलाने प्रामुख्याने इराणमधील आण्विक तळांना लक्ष्य केल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ सुरू केल्याची घोषणा केली आहे.