Why Spend So Much On Diyas In Diwali Says Akhilesh Yadav: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, त्यांनी दिवाळीच्या तोंडावर केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ख्रिसमस आणि दिवाळीची तुलना केली आणि दिवे व मेणबत्त्यांवर होणारा खर्च हा अपव्यय असल्याचे म्हटले. अखिलेश यादव यांच्या विधानावर राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, भाजपाने त्यावर जोरदार टीका केली आहे.

लखनौ येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, “मी भगवान रामाच्या नावाने एक सूचना देऊ इच्छितो. पहा, जगभरात नाताळचा काळ असतो. तेव्हा संपूर्ण शहरे लाइट्सनी उजळलेली असतात आणि ती महिनोनमहिने तशीच राहतात. त्यांच्याकडून शिका. दिवाळीत दिवे आणि मेणबत्त्यांवर इतका खर्च का करायचा? या सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? हे सरकार उलथवून टाका. आमचे सरकार आल्यास आम्ही सुंदर रोषणाई करू.”

यावेळी उत्तर प्रदेशातील वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक कोंडी होणे आणि नागरी सुविधांचा अभाव यासाठी अखिलेश यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बिहार दौऱ्यावरही त्यांनी टीका केली आणि त्यांना “स्टार-स्प्लिटिंग एजंट” असे म्हटले. बिहारमधील लोक कधीही जातीय विचारसरणी स्वीकारणार नाहीत, असे ते म्हणाले.

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, समाजवादी पक्षाचा इतिहास हिंदूविरोधी आहे. राम मंदिर आंदोलनादरम्यानही या पक्षाने विरोध केला होता. शहजाद यांनी आरोप केला की, हाच पक्ष आता दिवे लावण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. ते म्हणाले की, सैफईमध्ये भव्य उत्सव होतात, परंतु जेव्हा अयोध्येत प्रकाशोत्सव साजरा केला जातो, तेव्हा प्रश्न उपस्थित होतात.

भाजपाचे नेते संजय राय यांनी अखिलेश यादव यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “अखिलेश यादव यांना दिवाळीत दिव्यांपासून त्रास आहे, पण त्यांना ख्रिसमस आवडतो. दिव्यांच्या विक्रीमुळे प्रजापती समाज आणि शेतकऱ्यांना रोजगार मिळतो. अखिलेश यादव आता म्हणत आहेत की हिंदूंनी दिवाळीत दिवे लावू नयेत. जनता लवकरच अशा हिंदूविरोधी व्यक्तीला त्यांच्या मताच्या बळावर धडा शिकवेल.”