Rudrapryag Accident: उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा नदीत गुरूवारी (२६ जून) बस कोसळून भीषण अपघात झाला होता. या बसमध्ये १८ प्रवासी प्रवास करत होते. पार्थ सोनी या १० वर्षांच्या मुलाने अपघातात आपले पालक गमावले. हताशपणे बचावकार्य पाहत असलेल्या पार्थचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो भगवान बद्रीनाथला प्रार्थना करत घडलेल्या घटनेचा जाब विचारत आहे. हा हृदयद्रावक व्हिडीओ पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.

१० वर्षांचा पार्थ अलकनंदा नदीकडे पाहत म्हणतो, “देवा हे तू काय केलेस? आमची काय चूक होती? आम्ही तुझे भक्त होतो”. पार्थचे कुटुंब हे मध्यप्रदेशच्या राजगड येथील होते. पार्थ हा विशाल सोनी (४२) आणि गौरी सोनी (४१) यांचा एकुलता एक मुलगा असून तो या अपघातामधून वाचला. दरम्यान अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अजूनही आठ जण बेपत्ता आहेत.

पावसाचा जोर आणि नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बेपत्ता असलेल्या व्यक्ती सुखरूप सापडणे अवघड असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एनके राजवर यांनी सांगितले.

शुक्रवारी उशीरा उदयपूरमधील संजय सोनी (५५) यांचा मृतदेह जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला आढळून आला. यामुळे आता मृतांची संख्या चारवर पोहोचली. कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात येईल, असे रुद्रप्रयागच्या जिल्हा आपत्कालीन ऑपरेशन सेंटरने सांगितले.

पार्थच्या पालकांचा मृतदेह आज घरी पोहोचणार

अपघातग्रस्त ३१ सीटर बस राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील १९ यात्रेकरूंना घेऊन जात होती. हे सर्व एकाच कुटुंबातील असून देवदर्शन करण्यासाठी त्यांनी सहल आयोजित केली होती. बद्रिनाथला जात असताना एका ट्रकला धडक बसल्यामुळे सदर अपघात झाला.

पार्थ आपल्या आईच्या शेजारी बसमध्ये बसला होता. अपघात झाल्यानंतर तो थोडक्यात बचावला. आई-वडील गमावल्यानंतर त्याला जबर धक्का बसला आहे, असे त्याचे काका निलेश सोनी यांनी सांगितले. पार्थ चार धाम यात्रेसाठी पालकांसह उत्तराखंडला गेला होता. तर त्याची बहीण तेजस्विनी (१७) आणि मनस्विनी (१५) राजगडमध्येच राहिल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशाल आणि गौरी सोनी यांचे मृतदेह आज (शनिवारी) मध्य प्रदेशच्या राजगड येथे पोहोचणार आहेत.