गेल्या महिन्याभरापासून रशियन फौजा युक्रेमध्ये धुमाकूळ घालत आहेत. युक्रेनच्या अनेक भागांमध्ये रशियन फौजांनी हल्ले केले आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेन आणि रशिया या दोघांनाही काही देशांकडून समर्थन मिळत आहे. युक्रेनच्या बाजूने आता नेटो, अमेरिका आणि इतरही अनेक युरोपीयन देश उभे राहिले असताना युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रशिाला कोंडीत पकडण्याची तयारी इतर देशांनी केलेली आहे. त्यात आता चीनकडून रशियाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली जाऊ लागली आहे. त्यामुळे आता थेट अमेरिकेने चीनला गंभीर इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये पूर्वापार चढाओढीचं राजकारण आणि युद्धाचं राजकारण होत आलं आहे. मात्र, ९०च्या दशकात रशियाच्या विघटनानंतर अमेरिका जागतिक महासत्ता बनली. मात्र, त्यानंतर देखील या दोन्ही देशांमधले सबंध वास्तव पातळीवर सुधारले नसल्याचंच दिसून आलं. त्याचाच प्रत्यय आता युक्रेन युद्धाच्या निमित्ताने देखील येऊ लागला आहे. अमेरिकेने रशियाच्या आक्रमक वृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून चीनला बायडेन यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावलं आहे.

नेटो राष्ट्रांची तातडीची बैठक

रशियाच्या आक्रमक धोरणाला आवर घालण्यासाठी अमेरिकेने ब्रुसेल्समधील नेटोच्या मुख्यालयात नेटो सदस्य राष्ट्रांची तातडीची बैठक बोलावली आहे. यावेळी त्यांनी चीनबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “गेल्या आठवड्यात माझं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बरंच स्पष्ट संभाषण झालं. मी त्यावेळी कोणती धमकी दिली नाही. पण हे मात्र स्पष्ट केलं की रशियाला मदत करण्याचे परिणाम शी जिनपिंग यांना माहिती असावेत”, असं बायडेन म्हणाले.

“मला वाटतं चीनला हे माहिती आहे की त्यांचे आर्थिक हितसंबंध हे रशियापेक्षाही जास्त प्रमाणात पाश्चात्य देशांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे मला आशा आहे की शी जिनपिंग या युद्धात चीनला सहभागी करणार नाहीत. चीननं या बैठकीमध्ये पाश्चात्य देशांशी असलेले संबंध वृद्धींगत करण्याचा देखील मानस बोलून दाखवला आहे”, असं देखील बायडेन यांनी यावेळी नमूद केलं.

“…तर नेटोच्या फौजा युद्धात उतरतील”, जो बायडेन यांचा रशियाला गंभीर इशारा! पुतीन यांच्या आक्रमणाला चाप बसणार?

रशियावर दीर्घकालीन निर्बंध, जी-२०मधून हकालपट्टी?

दरम्यान, नेटोच्या बैठकीत रशियावर प्रदीर्घ काळासाठी निर्बंध लादले जाण्याचे सूतोवाच बायडेन यांनी यावेळी केले. “रशियावर निर्बंध दीर्घ काळासाठी लागू ठेवणं ह वेदनादायी असेल. मी नेटो राष्ट्रांची तातडीची बैठक याचसाठी बोलावली आहे की त्यातून सध्या सुरू असलेले निर्बंध दीर्घकाळ सुरू ठेवता यावेत. फक्त पुढचा महिना किंवा त्यापुढचा महिना नाही तर संपूर्ण वर्षभर”, असं बायडेन यांनी नमूद केलं. तसेच, रशियाची जी-२० समूहातून हकालपट्टी करण्याचा देखील विचार सुरू असल्याचं ते म्हणाले.

“या निर्बंधांचा फटका फक्त रशियालाच बसणार नाही. त्यांच्यासोबतच इतरही अनेक देशांवर हे निर्बंध लादले जातील. याचे परिणाम युरोपीय देशांसोबतच अमेरिकेवरही होणार आहेत”, असं बायडेन म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American president joe biden warns china helping russia against ukraine war pmw
First published on: 25-03-2022 at 09:10 IST