महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच देश पातळीवर ‘एक देश, एक निवडणूक’ मुद्दा तापू लागला आहे. याच महिन्यात मोदी सरकारने संसदचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात सरकार नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर वा प्रस्तावांवर चर्चा घडवून आणणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. याच अधिवेशनात एक देश, एक निवडणूक विधेयक पारित करून घेण्यावर मोदी सरकारचा भर असल्याचं बोललं जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठं विधान केलं आहे.
“मोदी सरकार संसद विसर्जित करणार”
मोदी सरकार संसद विसर्जित करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता अमोल कोल्हेंनी वर्तवली आहे. “लोकसभा विसर्जित केली जाते, तेव्हा सर्व सदस्यांचा ग्रुप फोटो काढला जातो. मिळालेल्या माहितीनुसार हा ग्रुप फोटो काढण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. याचाच अर्थ, हे विशेष अधिवेशन १७व्या लोकसभेचं कदाचित शेवटचं अधिवेशन असू शकतं. लोकसभा विसर्जित करून मोदी सरकार मुदतपूर्व निवडणुकांना सामोरं जाऊ शकतं”, अशी भीती अमोल कोल्हेंनी वर्तवली आहे.
मुदतपूर्व निवडणुकांचा अट्टहास का?
अमोल कोल्हेंनी आपल्या यूट्यूब चॅनलवर राजकीय विश्लेषण करताना या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. मोदी सरकार संसद विसर्जित करून मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकतं, अशी शक्यता वर्तवतानाच त्यासाठी मोदी सरकार का प्रयत्नशील आहे, यावरही कोल्हेंनी भूमिका मांडली आहे. “२०१४पासून सर्व निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराचा हुकमी एक्का मोदीच राहिले आहेत. पण गेल्या काही दिवसांत या मोदी ब्रँडची लोकप्रियता किंवा करिष्मा ओसरताना आपण पाहातो आहोत. मग अविश्वास ठरावावरचं मोदींचं भाषण असो किंवा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरचं त्यांचं भाषण असो”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
“सिलेंडर दरकपातीचं ट्रम्पकार्डही फोल”
“जुलै महिन्यातही मणिपूर पेटलेलं असताना मोदींनी कर्नाटक प्रचारात स्वत:ला झोकून दिलं होतं. पण तरीही कर्नाटकमध्ये भाजपाचा दारूण पराभव झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी घरगुती गॅसवर २०० रुपयांची सवलत देण्याचं ट्रम्पकार्ड मोदींनी खेळून पाहिलं. पण हा डावही फसला. ९ वर्षांत सिलेंडरमागे ७००-७५० रुपयांची भाववाढ वसूल केल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर २०० रुपयांची सवलत म्हणजे चुनावी जुमला आहे हे जनतेनं पुरेपूर ओळखलं आहे”, असंही अमोल कोल्हेंनी नमूद केलं आहे.
मोदी सरकार संसद विसर्जित करणार? अमोल कोल्हेंचा मोठा दावा; म्हणाले, “त्या’ फोटोची तयारी पूर्ण!”
“..तर मोदी ब्रँड ओसरू लागल्यावर शिक्कामोर्तब होईल”
“नोव्हेंबर महिन्यात मिझोराम, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुका लागल्या आहेत. निवडूकपूर्व कल पाहिले, तर छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश व तेलंगणा या चारही राज्यांत भाजपा सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नाही. जर पराभव झाला तर तो भाजपाचा. मग माध्यमांसमोर चेहरा येतो तो राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा. पण विजय झाला तर मात्र मोदींचा ही रणनीती लोकांनी पुरेपूर ओळखली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा पराभव चार राज्यांत झाला तर मोदी ब्रँडचा प्रभाव ओसरू लागल्यावर शिक्कामोर्तब होईल. ही भावना संपूर्ण देशात निर्माण होईल याची भीती भाजपाला वाटतेय”, अशा शब्दांत अमोल कोल्हेंनी भाजपाच्या रणनीतीविषयी भाष्य केलं आहे.
“..ही मोदी सरकारची डोकेदुखी आहे”
“२०१९ ते २०२३ यात परिस्थितीत खूप बदल झाला आहे. महागाई, बेरोजगारी यावर मोदी सरकारकडे कोणतंही ठोस उत्तर सापडलेलं नाही. त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, विखारी सामाजिक वातावरण, बेभरवशाचं निर्यात धोरण, शेतकऱ्यांचं नुकसान, योजनांमधलं अपयश व अच्छे दिन जनतेच्या दृष्टीक्षेपात न येणं ही मोदी सरकारची डोकेदुखी आहे”, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.