scorecardresearch

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

“सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित असताना…”, असेही कोल्हेंनी सांगितलं.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
अमोल कोल्हे अमित शाह ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापुरातील गावांवर दावा सांगितल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी बेळगावात महाराष्ट्रातील ट्रकवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आता महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. तसेच, अमित शाह सीमावादावर १४ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

अमित शाह यांच्याशी भेट घेतल्यावर अमोल कोल्हे यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. “कर्नाटक सरकारकडून अडेलटट्टू आणि हडेलहट्टीपणाचे धोरण राबवलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने विधान केली जातात. महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ले करण्यात येत असून, मंत्र्यांना कर्नाटकात येण्यापासून रोखलं जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं आहे. त्यामुळे देशात कुठे फिरण्याची मुभा दिली आहे. यालाच कुठेतरी आडकाठी करण्याचं काम केलं जात आहे,” अशी टीका अमोल कोल्हे यांनी कर्नाटक सरकारवर केली.

“अमित शाहांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांची बाजू संवेदनशीलपणे ऐकूण घेतली. परस्पर समन्वयाने तोडगा काढू, असं आश्वासन शाहांनी दिलं. मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी गृहमंत्री १४ डिसेंबरला चर्चा करणार असल्याचं कळलं. त्यामुळे समन्वयातून मार्ग निघेल. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी येथील मराठी भाषिकांवर सातत्याने अत्याचार होत आहे. त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवला जातोय, यावर कुठेतरी चाप बसून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असेही अमोल कोल्हेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 14:05 IST

संबंधित बातम्या