‘प्रसारमाध्यमांच्या टीकेमागे कट’

शस्त्रास्त्र दबावगटाच्या वतीने प्रसारमाध्यमे आपल्यावर टीका करीत आहेत. हा दबावगट आपल्याविरोधात अहोरात्र काम करीत असून त्यांनी आपल्याविरोधात अप्रत्यक्ष मोहीम उघडली आहे, असे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री निवृत्त जनरल व्ही.के.सिंह यांनी सांगितले.

शस्त्रास्त्र दबावगटाच्या वतीने प्रसारमाध्यमे आपल्यावर टीका करीत आहेत. हा दबावगट आपल्याविरोधात अहोरात्र काम करीत असून त्यांनी आपल्याविरोधात अप्रत्यक्ष मोहीम उघडली आहे, असे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री निवृत्त जनरल व्ही.के.सिंह यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण या कटकारस्थानांची माहिती दिली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. लष्कर प्रमुख असताना आपण शस्त्रास्त्र दबावगटापुढे झुकलो नाही त्यामुळे ते आता आपल्याला वाकवण्यासाठी अप्रत्यक्ष मोहीम चालवत आहेत, कट करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.
२३ मार्चला पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने पाकिस्तान दिनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला व्ही.के.सिंग उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांनी येमेनमधील भारताच्या मदतकार्य मोहिमेची तुलना पाकिस्ताच्या मोहिमेशी करताना त्यांनी पत्रकारांबाबत अनुद्गार काढले व नंतर माफीही मागितली होती.
शस्त्रास्त्र दबाव गट तुमच्याविरोधात सक्रिय आहे काय, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांनी आपल्याला बाजूला करण्यासाठी निवडणुकीच्या वेळीही बराच पैसा ओतला. आपण पंतप्रधानांना या सगळ्या बाबींची कल्पना दिली आहे. त्यावर पंतप्रधान काय म्हणाले असे विचारले असता ते म्हणाले की, मोदी माध्यमांना सामोरे जाण्यात हुशार आहेत व ते सगळे आपल्यावर सोडा असे सांगून त्यांनी आपल्याला (व्ही.के.सिंह) निर्धास्त केले.
राफेल विमानांच्या खरेदीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, संरक्षण मंत्री र्पीकर यांच्याशी आपण बोललो आहोत. त्यांना सगळे समजून दिले आहे, जर कुणाला एखादा विशिष्टच मोबाईल घ्यायचा असेल तर तो आणखी ३६ महिन्यांनी घेण्यात काहीच अर्थ नसतो. आपले खरेदी धोरण हे सापशिडीसारखे आहे पण त्यात सापच आहेत शिडय़ा नाहीत, तुम्हाला कुणीही केव्हाही मारते अन् तुम्ही गप्प बसता, त्यामुळे सदैव सज्जच असले पाहिजे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arms lobby running insidious campaign to subdue me

ताज्या बातम्या