Bihar Protest against Agneepath Scheme: केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केल्यानंतर बिहार आणि राजस्थानमध्ये विरोध होऊ लागला आहे. बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आलं असून दगडफेक करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये आंदोलन करण्यात येत असून अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक अडवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्र्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक केली आणि एका डब्याला आग लागली, योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये भारतीय लष्कराचे चाहते असा बॅनर घेतला होता. फक्त २५ टक्के युवकांना सेवेत घेतलं जाणार असल्याने चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

सैन्यभरतीसाठी ‘अग्निपथ’!; संरक्षण दलांच्या सेवेत कंत्राटी पद्धत, ‘अग्निवीरां’ची चार वर्षांसाठी नियुक्ती

विद्यार्थ्यांकडून दगडफेक होत असल्याने आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. यासोबत विद्यार्थ्यांनी लावलेली आग विझवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

बक्सर रेल्वे स्थानकावर आंदोलन, अजमेर-दिल्ली हायवे रोखला

बक्सर जिल्ह्यात १०० हून अधिक तरुण रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. ट्रॅकवर उतरत तरुणांनी जनशताब्दी एक्स्प्रेस ३० मिनिटांसाठी रोखली होती. दुसरीकडे जयपूरमध्ये १५० लोकांनी अजमेर-दिल्ली हायवे रोखला. पोलिसांनी १० आंदोलकांना अटक केली आहे.

देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. ‘‘अग्निपथ भरती योजना हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. त्यामुळे संरक्षण दलांना आणखी तरुण चेहरा प्राप्त होईल. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल’’, असं सिंह यांनी सांगितलं होतं. या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षणदलांना मिळतील, असा विश्वास नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरिकुमार यांनी व्यक्त केला होता.

मोबदला काय?

यंदा ४६,००० जणांची ‘अग्निवीर’ म्हणून भरती केली जाईल. ही भरती तीन महिन्यांतच सुरू होईल. त्यासाठी साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा असेल. पहिल्या वर्षी ‘अग्निवीरां’ना मासिक ३० हजार रुपये मोबदला मिळेल. त्यांना दुसऱ्या वर्षी ३३,०००, तिसऱ्या वर्षी ३६,५०० आणि चौथ्या वर्षी ४०,००० मोबदला मिळणार आहे. प्रत्येक ‘अग्निवीरा’ला ११.७१ लाख सेवानिधी मिळणार असून, हे उत्पन्न करमुक्त असेल, शिवाय, त्यांना सेवाकाळात ४८ लाखांचे विमाकवचही मिळेल़

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army aspirants violent protests in bihar over centres agnipath scheme tear gas fired sgy
First published on: 16-06-2022 at 12:03 IST