India-China Border Issue: अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मंगळवारी म्हटले की, राज्याच्या सीमेजवळ बांधण्यात येणारे चीनचे मेगा धरण “वॉटर बॉम्ब” असेल आणि ते आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण करू शकते.

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पेमा खांडू म्हणाले की, ब्रह्मपुत्रा नदीचे तिबेटी नाव असलेल्या यारलुंग त्सांगपो नदीवरील जगातील सर्वात मोठा धरण प्रकल्प हा गंभीर चिंतेचा विषय आहे, कारण चीन आंतरराष्ट्रीय जल करारावर स्वाक्षरी करणारा देश नाही. पण जर ते या कराराचा भाग असते, तर त्यांना आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यास भाग पाडता आले असते.

“मुद्दा असा आहे की चीनवर विश्वास ठेवता येत नाही. ते काय करतील, हे कोणालाही माहिती नाही,” असे पेमा खांडू मुलाखतीत म्हणाले.

“चीनकडून असलेला लष्करी धोका बाजूला ठेवला, तरी मला वाटते की हा मुद्दा इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा अधिक गंभीर आहे. यामुळे आमच्या जमातींच्या अस्तित्वाला आणि उपजीविकेला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब खूप गंभीर आहे, कारण चीन याचा वापर ‘वॉटर बॉम्ब’सारखा देखील करू शकतो,” असे त्यांनी पुढे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, जर चीन आंतरराष्ट्रीय पाणीवाटप करारांवर स्वाक्षरी करणारा देश असता, तर हा प्रकल्प एक वरदान ठरू शकला असता, कारण त्यामुळे अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेशमधील उन्हाळ्यातील पूर टाळता आला असता.

“पण चीन पाणीवाटप करारांवर स्वाक्षरी करणारा देश नाही, आणि हीच समस्या आहे. समजा धरण बांधले गेले आणि त्यांनी अचानक पाणी सोडले, तर आपला संपूर्ण सियांग पट्टा नष्ट होईल. मानवी जीवनावर विनाशकारी परिणाम होतील”, असे त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी पीटीआयला सांगितले की, केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने ‘सियांग अप्पर मल्टिपर्पज प्रोजेक्ट’ नावाचा एक प्रकल्प हाती घेतला आहे, जो संरक्षण यंत्रणा म्हणून काम करेल आणि जलसुरक्षाही निश्चित करेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मार्चमध्ये केंद्र सरकारने म्हटले होते की, ते ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहेत आणि देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करत आहेत.