Asaduddin Owaisi on Operation Sindoor : भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर भारत पाकिस्तानला काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचदरम्यान, भारतीय सैन्यदलाने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारताने पाकिस्तानवर केलेल्या या एअर स्ट्राईकचं स्वागत करत असल्याचं म्हटलं आहे.
“आपल्या सैन्यदलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे मी स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेटला असा कठोर धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून पहलगाम घटनेची पुन्हा कधीही पुनरावृत्ती होणार नाही. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा पाया पूर्णपणे नष्ट केला पाहिजे. जय हिंद!” अशी पोस्ट असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. ओवेसी यांनी केलेली ही पोस्ट चर्चेत आहे.
असदुद्दीन ओवेसींची पोस्ट

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील त्या नऊ ठिकाणांवर हल्ले केले आहेत, जिथून भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली होती. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला. पाकिस्तानमधून कारवाया करणारे लष्कर ए तैय्यबा, जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवाद्यांच्या तळांवर भारतानं हल्ला केला. भारताने कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नसून फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल पोस्ट करून माहिती दिली.
भारताने एअर स्ट्राईक केलेली पाकिस्तानमधील ९ ठिकाणं
१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद
या नऊ ठिकाणी भारतीय सैन्यदलाने बुधवारी मध्यरात्री एअर स्ट्राईक केला.
पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. आज देशात काही ठिकाणी मॉक ड्रील होईल, असं जाहीर करण्यात आलं होतं, त्याआधीच भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे.