मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी संसदेत नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या अविश्वास ठरावावर बोलताना मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मणिपूरमधील परिस्थिती इतकी गंभीर असताना तिथल्या मुख्यमंत्र्यांची पदावरून हकालपट्टी का केली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला.

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मणिपूर आणि हरियाणातील हिंसाचारावरून सरकारला धारेवर धरलं. तसेच या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का मागितला नाही? असा प्रश्नही उपस्थित केला. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री तिथल्या हिंसाचाराला जबाबदार असून त्यांना आजपर्यंत त्या पदावरून हटवलं का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

औवेसी म्हणाले, मणिपूर आणि हरियाणाचे मुख्यमंत्री काय करतायत? एकीकडे ५० हजार लोक बेघर झाले आहेत, तर दुसऱ्या राज्यात तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. महिलांची विवस्त्र धिंड काढली गेली. पोलीस ठाण्यांसह सरकारी शस्त्रास्त्र लुटली जात आहेत. यावेळी ओवैसी यांनी एक शायरी म्हणत सरकारवर टीका केली. ओवैसी म्हणाले, ‘कुर्सी है तुम्हारा ये जनाज़ा तो नहीं है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते?

हे ही वाचा >> “दाढी आणि कपडे पाहून त्याने…”, असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत मांडला जयपूर-मुंबई ट्रेनमधील हत्याकांडाचा मुद्दा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मणिपूरचे मुख्यमंत्री का बदलले नाहीत?

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री बदलण्याच्या मागणीवर काल (९ ऑगस्ट) लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की मणिपूरचे मुख्यमंत्री केंद्राला सहकार्य करत आहेत आणि सध्या अशा बदलाची गरज नाही. जर एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री केंद्राला सहकार्य करत नसतील तर तशा पद्धतीच्या हालचाली (मुख्यमंत्री बदलाच्या) करता येतात. परंतु, हे मुख्यमंत्री केंद्राला सहकार्य करत आहेत. जेव्हा एखादं राज्य सरकार सहकार्य करत नसतं, तेव्हा तिथे कलम ३५६ लागू करता येतं. आम्ही मणिपूरच्या पोलीस महासंचालकांची उचलबांगडी केली आहे.