भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये काँग्रेसने बुधवारी बदल जाहीर केला. सुमावली, पिपारिया, बडनगर आणि जाओरा या चार मतदारसंघांमधील उमेदवार बदलत असल्याची घोषणा काँग्रेस समितीमार्फत बुधवारी सकाळी करण्यात आली. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांविरोधात कार्यकर्त्यांनी राज्यात विविध ठिकाणी निदर्शने केली होती. त्यानंतर पक्षाला हा निर्णय घेण्यास भाग पडले.
बडनगरमध्ये राजेंद्र सिंह सोलंकी यांच्या उमेदवारीविरोधात प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या घराबाहेर निदर्शने केली होती. तिथे आता मुरली मोरवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पिपारिया मतदारसंघामधून काँग्रेसने आधी गुरु चरण खरे यांना उमेदवारी दिली होती, त्यांच्याऐवजी आता वीरेंद्र बेलवंशी निवडणूक लढवतील.
हेही वाचा >>> “लिहून घ्या! आता मोदी सरकार येणार नाही..”, राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक काय म्हणाले?
सुमावलीमध्ये विद्यमान आमदार अजब सिंह कुशावाहा यांना उमेदवारी नाकारून कुलदीप सिकरवार यांना देण्यात आली होती. त्यानंतर कुशावाहा यांनी आपल्या समर्थकांसह निदर्शने केली होती. तिथेही उमेदवार बदलण्यात आला असून कुशावाहा यांची उमेदवारीची मागणी मान्य करण्यात आली आहे.
जावरा मतदारसंघात हिंमत शिरमल यांच्या उमेदवारीविरोधातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्याऐवजी आता वीरेंद्र सिंह सोलंकी हे उमेदवार असतील. राज्यात एकाच टप्प्यात १७ नोव्हेंबरला सर्व २३० जागांवर मतदान होत असून काँग्रेसने सर्व तर भाजपने २२८ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३० ऑक्टोबर ही शेवटची मुदत आहे.
केंद्राच्या योजना पोकळ! प्रियंका गांधी यांची टीका
जयपूर : केंद्र सरकारच्या योजना ‘पोकळ’ असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी बुधवारी राजस्थानातील झुनझुनू जिल्ह्यातील अरदवता येथील जाहीर सभेत बोलताना केली. त्याच वेळी राज्यातील काँग्रेस सरकारच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त घरांना ५०० रुपयांना स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर आणि महिला कुटुंबप्रमुखांना वर्षांला १० हजार रुपये देण्याची घोषणा केली.
केंद्र सरकारवर टीका करताना प्रियंका म्हणाल्या की, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्यासंबंधी विधेयक संसदेमध्ये मंजूर करण्यात आले आहे, पण त्याच्या अंमलबजावणीसाठी १० वर्षे लागतील.
शोभाराणी कुशवाहा यांचा काँग्रेस प्रवेश
जयपूर : राजस्थानातील धोलपूरच्या भाजपच्या बडतर्फ आमदार शोभाराणी कुशवाहा यांनी अन्य तीन नेत्यांसह बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. झुनझुनू जिल्ह्यामधील अरदावता येथे जाहीर सभेमध्ये पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी कुशवाहा यांनी पक्षाचा आदेश डावलून मतदान केल्यामुळे भाजपने त्यांना बडतर्फ केले होते.
छत्तीसगडमध्ये भाजपची चौथी यादी जाहीर
रायपूर : भाजपने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी उरलेल्या चार जागांसाठी बुधवारी चौथी यादी जाहीर केली. या सर्व जागा अनारक्षित असून त्यासाठी नवीन चेहरे देण्यात आले असून एका विद्यमान आमदाराला तिकीट नाकारण्यात आले आहे. बेलतारा मतदारसंघात रजनीश सिंह यांना उमेदवारी नाकारून सुशांत शुक्ला यांना देण्यात आली आहे. अंबिकापूरमध्ये काँग्रेसच्या टी एस सिंह देव यांच्याविरोधात राजेश अग्रवाल, कासडोलमध्ये धनीराम धीवर आणि बेमतारा मतदारसंघात दीपेश साहू यांच्यावर भाजपने विश्वास ठेवला आहे. भाजपने राज्यातील सर्व ९० जागांवर उमेदवार जाहीर केले असून त्यापैकी ३३ ओबीसी, ३० अनुसूचित जमाती आणि १० अनुसूचित जातीचे आहेत. तसेच विद्यमान १३ पैकी दोन आमदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे.
मिझोरममध्ये ११२ कोटय़धीश उमेदवार;‘आप’चा प्रदेशाध्यक्ष सर्वात श्रीमंत
ऐझवाल : मिझोरम विधानसभा निवडणुकीत ४० मतदारसंघांमध्ये एकूण १७४ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी ११२ उमेदवार कोटय़धीश आहेत. आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अँडर्य़ू लालरेमकिमा पचुआ हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी जवळपास ६९ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.
उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, ६४.४ टक्के उमेदवारांनी एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या ‘आप’च्या पचुआ यांनी ६८ कोटी ९३ लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली असून ते ऐझवाल उत्तर-तीन या मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत.
पचुआ यांच्या खालोखाल काँग्रेसच्या आर वनलालत्लुअंगा यांनी ५५ कोटी ६० लाखांची मालमत्ता असल्याचे सांगितले आहे. ते सेरछिप मतदारसंघातून रिंगणात आहेत. झोराम पीपल्स मूव्हमेंटचे एच गिन्झालाला हे तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे ३६ कोटी ९० लाखांची मालमत्ता असून ते चंपई उत्तर या मतदारसंघातून उभे आहेत. या सर्वांनी आपल्या उत्पन्नाचे स्रोत व्यवसाय असल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले आहे. महिलांपैकी लुंगलेई दक्षिण या मतदारसंघातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या मरियम एल हरंगचल या सर्वात श्रीमंत महिला उमेदवार आहेत.
सेरछिपमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे रामहलून-एडेना हे सर्वात गरीब उमेदवार आहेत. त्यांच्याकडे केवळ १,५०० रुपये मूल्य असलेली जंगम मालमत्ता आहे.
अभिनेता राजकुमार राव राष्ट्रीय दूत
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी अभिनेता राजकुमार राव याला राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्त केले. मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे नेहमी लोकप्रिय, प्रसिद्ध व्यक्तींची राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्ती केली जाते. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी, मेरी कोम, पंकज त्रिपाठी, आमिर खान यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तेच काम आता राजकुमार राव करणार आहे. राजकुमार राव याने ‘न्यूटन’ या चित्रपटामध्ये नक्षलग्रस्त भागांमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका केली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तसेच राजकुमार राव याच्या अभिनयाचीही प्रशंसा झाली होती. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करलाही पाठवण्यात आला होता.