वृत्तसंस्था, बर्लिन : युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या युक्रेनच्या झापोरीझ्झिया प्रकल्पाचा बाह्य विद्युत पुरवठा शनिवारी खंडित झाला. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे वाहिनीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. सध्या या प्रकल्पातून वीजनिर्मिती बंद असली तरी किरणोत्सारी इंधन थंड ठेवण्यासह अन्य सुरक्षा उपकरणांसाठी विजेची गरज असून याची आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) दखल घेतली आहे.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी आयएईएला दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री १ वाजता अणुऊर्जा केंद्राला बाहेरून होणारा वीजपुरवठा खंडित झाला. सध्या ‘जनरेटर’द्वारे वीज सुरू ठेवली असून १० दिवस पुरेल एवढे डिझेल शिल्लक आहे. तसेच वीजपुरवठा नियमित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अणुऊर्जा केंद्रावर हल्ला करून वीजपुरवठा खंडित करणे ही बेजबाबदार कृती असल्याचे ताशेरे आयएईएने ओढले आहेत. मात्र संस्थेने अद्याप याबाबत कुणालाही जबाबदार धरलेले नाही.