दिल्लीत रविवारी लोकसभेसाठीचं मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपचे उमेदवार बलबीर सिंह जाखड यांच्या मुलाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. माझे वडील बलबीर सिंह जाखड यांनी तिकिट मिळवण्यासाठी अरविंद केजरीवालांना सहा कोटी रूपये मोजले असा आरोप त्यांचा मुलगा उदय सिंह जाखड याने केला आहे. माझ्या वडिलांनी स्वतः मला ही बाब सांगितली. माझ्या वडिलांनी तीन महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. माझे वडील कधीच आप या पक्षात नव्हते आणि त्यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनातही सहभाग घेतला नव्हता असंही उदय सिंह जाखडने म्हटलं आहे.

उदय म्हणतो, माझ्या वडिलांनी मला सांगितलं की त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळणार आहे. ज्यासाठी मी अरविंद केजरीवाल आणि गोपाळ राय यांना ६ कोटी रूपये दिले आहेत. त्यानंतर खरोखरच त्यांना तिकिट मिळालं. मला हाच प्रश्न पडला की राजकारणाची काहीही पार्श्वभूमी नसताना माझ्या वडिलांना तिकिट कसं मिळालं. मी त्यांना शिक्षणासाठी पैसे मागितले तर त्यांनी मला मनाई केली. माझ्या वडिलांनी काँग्रेस नेते १९८४ शीख विरोधी दंगलीत चिथावणीचा आरोप असलेल्या सज्जन कुमार यांचा जामीन देण्याचाही प्रयत्न केला होता. यासाठी ते मोठी रक्कम अदा करण्यासही तयार झाले होते असाही आरोप उदय सिंह जाखड याने केला आहे.

दरम्यान या आरोपानंतर बलबीर सिंह जाखड यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा दिला. माझ्या मुलाने केलेले आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत असं जाखड यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर मी माझ्या मुलाशी या विषयावर बोललोच नाही, त्याचे आणि माझे बोलणेही फार कमी प्रमाणात होते असंही जाखड यांनी सांगितलं. माझा मुलगा उदय हा त्याच्या जन्मपासूनच त्याच्या आईच्या घरी रहातो. मी माझ्या पत्नीला २००९ मध्ये घटस्फोट दिला आहे असंही जाखड यांनी सांगितलं.

दिल्लीत लोकसभेच्या सात जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. पश्चिम दिल्लीच्या जागेसाठी भाजपाने प्रवेश वर्मा, काँग्रेसने महाबल मिश्रा आणि आपने बलबीर सिंह जाखड यांना उमेदवारी दिली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी हे प्रकरण समोर आले आहे. मात्र जाखड यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.