मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी म्हणू नका. मी एक बलूच आहे. जन्मस्थळावरून मला अनेकवेळा संकटाचा सामना करावा लागत आहे, अशी खंत मजदक दिलशाद बलूच याने व्यक्त केली. मुळचा बलुचिस्तानचा व कॅनडाच्या पासपोर्टवर भारतात आलेल्या मजदकला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवल्यानंतर हा प्रकार सर्वांसमोर आला.
मजदकच्या पासपोर्टवर पाकिस्तान क्वेटा असा उल्लेख असल्याने दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मजदकची चौकशी केली. सध्या बलुचिस्तानमधील अनेक नागरिक जगभरात विविध ठिकाणी निर्वासित म्हणून आयुष्य कंठत असल्याचे त्याने इॅकानॉमिक टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. बलुचिस्तानातील नागरिकांवर पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्याची माहिती त्याने या वेळी दिली.
चित्रपट निर्माते असलेल्या मजदकच्या वडिलांना पाकिस्तानी लष्कराने अपहरण करून दोन वर्षे ताब्यात ठेवले होते. त्याच्या आईवरही अत्याचार करण्यात आला. आपली संपत्तीही लुटण्यात आल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानकडून होणाऱ्या या अत्याचाराला कंटाळून त्याने २००८ मध्ये कॅनडामध्ये आश्रय घेतला.
मजदक व त्याची पत्नी सध्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत. पाकिस्तानला बलुचिस्तानची संस्कृती नष्ट करायची आहे. ते तिथे नरसंहार करत आहेत, हे सांगत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे.
मजदाक २०१० साली अफगाणिस्तानला पळून गेला होता. युनोच्या उच्चायुक्तांनी त्याला शरणार्थीचा दर्जा दिला. त्यानंतर तो कॅनडाला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केल्यामुळे आशादायक चित्र निर्माण झाल्याचे त्याने सांगितले. बलुचिस्तानला भारताचे समर्थन गरजेचे असून त्यामुळे आपल्याला आनंद झाला असल्याचे तो म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2016 रोजी प्रकाशित
मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी नको: मजदक बलुच
चित्रपट निर्माते असलेल्या मजदकच्या वडिलांना पाकिस्तानी लष्कराने अपहरण करून दोन वर्षे ताब्यात ठेवले होते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 20-08-2016 at 16:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baloch leader mazdak dilshad says call me dog but not pakistani