Who was Frank Caprio: कोर्ट म्हटले की, सामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर तणाव, काळ्या कोटातील वकील आणि न्यायदानासाठी बसलेले न्यायाधीश आठवतात. न्यायाधीश म्हटले की, गंभीर भावमुद्रा असलेली व्यक्ती सामान्यपणे डोळ्यासमोर उभी राहते. पण या सर्व ठोकताळ्यांना तडा देत अमेरिकेतील रोड आयलंड या बेटावरील न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांनी जगभरात किर्ती मिळवली. न्यायदान करणे हे फक्त दंड देण्याचे काम नसून त्यातून करुणा, सहानुभूती दाखवली जाऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले. म्हणूनच ८८ व्या वर्षी निधन झालेल्या कॅप्रियो यांच्यासाठी जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

८८ व्या वर्षांतही फ्रँक कॅप्रियो सोशल मीडियावर सक्रिय होते. इन्स्टाग्रामवर त्यांचे ३४ लाख फॉलोअर्स आहेत. इतर सोशल मीडिया, युट्यूब असे धरून जगभरात त्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. मृत्यू होण्याच्या काही क्षण आधी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक शेवटचा व्हिडीओ शेअर केला होता.

“मी पुन्हा आजारी पडलो असून रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा, मला आठवणीत ठेवा…”, असा संदेश त्यांनी दिला. मृत्यूशी झुंज देत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि नर्मविनोदी ढंगात बोलण्याची शैली कायम होती.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देताना अखेर कॅप्रियो यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर निवेदन प्रसिद्ध करत याची माहिती दिली. या निवेदनात कुटुंबाने कॅप्रियो लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारे एक चांगले व्यक्तीमत्व होते, असे म्हटले. “करुणा, नम्रता आणि लोकांच्या चांगुलपणावर अढळ विश्वास ठेवणारे न्यायाधीश कॅप्रियो हे न्यायालयीन कामाकाजाच्या पलीकडे जात लाखो लोकांच्या जवळचे व्यक्ती झाले होते”, असे या निवेदनात म्हटले आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये कॅप्रियो यांना कर्करोगाचे निदान झाले होते. अनेक महिने उपचार घेऊनही ते पूर्णपणे बरे होऊ शकले नाहीत.

कॉट इन प्रोव्हिडन्समुळे जगभरात पोहोचले

फ्रँक कॅप्रियो ज्या न्यायालयात न्यायदान करत होते, त्या न्यायालयातील सुनावणी कॉट इन प्रोव्हिडन्स (Caught in Providence) या युट्यूब चॅनेलवर दाखवली जात असे, या चॅनेलच्या माध्यमातून त्यांची दयाळू वृत्ती अनेकांना दिसली. सुनावणी दरम्यान त्यांच्या विनोदी टिप्पण्या, चिमटे आणि नैतिक निर्णयांमुळे ते अनेकांचे आवडते बनले होते.