Bangladeshi Illegal Immigrants Detained by Delhi Police : दिल्लीत राहणाऱ्या तीन जणांच्या एका कुटुंबाला अवैध बांगलादेशी घुसखोर समजून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना बांगलादेशला पाठवल्याचा दावा या कुटुंबाच्या नातेवाईकांनी केला आहे. या कुटुंबियांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की एका भारतीय कुटुंबाला पोलिसांनी बांगलादेशला पाठवलं आहे. हे कुटुंब मूळचं पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील रहिवासी आहे. मात्र, दिल्ली पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की दानिश शेख, त्याची पत्नी सुनाली खातून व त्यांच्या अल्पवयीन मुलाला व्हेरिफिकेशननंतरच (कागदपत्रांच्या पडताळणीनंतर) बांगलादेशला पाठवलं आहे. दी इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अलीकडेच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारच्या हस्तक्षेपानंतर काही लोकांना बांगलादेशमधून परत आणण्यात आलं आहे. रोहिणीचे पोलीस उपायुक्त राजीव रंजन यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की या लोकांचं आधी स्थानिक पोलिसांनी व्हेरिफिकेशन केलं. त्यानंतर एफआरओकडून चौकशी केली गेली. व्हेरिफिकेश आणि चौकशीनंतर २६ जून रोजी या सर्वांना बांगलादेशला पाठवण्यात आलं. यापैकी अनेकजण हे बांगलादेशमधील बागेरहाट परिसरातील रहिवासी होते.
पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी काय सांगितलं?
दरम्यान, शेख कुटुंबाच्च्या नातेवाईकांनी सांगितलं की शेख, त्यांची पत्नी सुनाली व त्यांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना दिल्लीमधील एका पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. हे कुंटुंब मूळचं पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील मुरारोई पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पैकर गावातील रहिवासी आहे. सुनालीची चुलत बहीण रोशनी बीबीने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की “ते मजूर कुटुंब आहे. गेल्या २० वर्षांपासून दिल्लीत कचरा गोळा करण्याचं काम करत आहे. १८ जुलै रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांनी जमीनीच्या कागदपत्रांसह वेगवेगळे दस्तावेज पोलिसांना दाखवले होते. मात्र, पोलिसांनी काही ऐकूनच घेतलं नाही.”
रोशनी बीबी म्हणाली, “शेख यांच्या दुसऱ्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही कारण ती आमच्या दुसऱ्या एका नातेवाईकाकडे राहत आहे. या कुटुंबाला बांगलादेशला पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी तिथून आमच्याशी संपर्क साधला. त्यामुळे आम्हाला हा सगळा प्रकार समजला. त्यांना बांगलादेशमध्ये कोणीतरी आश्रय दिला आहे. मात्र, ते नेमकं ठिकाण सांगू शकले नाहीत.”
देशभरातील बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई
अलीकडेच गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली व मध्य प्रदेशमधील अनेक बांगलादेशी लोकांना मायदेशी पाठवण्यात आलं आहे. मूळचे पश्चिम बंगालमधील रहिवासी असलेल्या एकूण सात जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या लोकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्यांना बांगलादेशला पाठवलं आहे. मुर्शिदाबादमधील चार तरुणांव्यतिरिक्त पूर्व, वर्धमानमधील एक आणि उत्तर २४ परगन्यातील एका दाम्पत्याला पश्चिम बंगाल सरकारच्या हस्तक्षेपानंतर बांगलादेशमधून परत आणलं आहे.