कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे भाऊ आणि काँग्रेसचे खासदार डीके सुरेश यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलत असताना दक्षिण भारत हा वेगळा देश जाहीर करावा, अशी मागणी केली. बंगळुरू ग्रामीणचे खासदार असलेले डीके सुरेश यांनी म्हटले की, केंद्र सरकार आमच्या वाट्याचा निधी उत्तरेतील राज्यांमध्ये वळवत आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारने दक्षिणेतील राज्यांवर असाच अन्याय सुरू ठेवला तर आम्ही वेगळ्या राष्ट्राची मागणी करू, असेही ते म्हणाले. या विधानानंतर आता भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेस खासदाराने देशाचे तुकडे करण्याची भाषा वापरली असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना डीके सुरेश म्हणाले, “आमच्या राज्यातून घेतलेला पैसा परत आमच्यासाठी खर्च केला असता तरी चालले असते. दक्षिणेतील राज्यातून जीएसटी, जकात आणि प्रत्यक्ष करातून जो पैसा गोळा होतो, तो आमच्यापर्यंत पोहोचला पाहीजे. पण दक्षिण भारताबरोबर चुकीचा व्यवहार केला जात आहे, असे आमच्या निदर्शनास आले.”

“आमच्याकडून कर रुपात गोळा होणारा पैसा उ्तर भारताकडे वळविला जात आहे. सर्वबाजूंनी दक्षिण भारतावर अन्याय केला जातो. असा दुजाभाव करणे योग्य नाही. जर असा दुजाभव होत असेल तर दक्षिण भारतातील लोकांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी पुढे केली पाहीजे. आम्हाला आमच्या वाट्याचा निधी मिळालाच पाहीजे. हिंदी पट्ट्यातून नेहमीच दक्षिणेतील राज्यांना सापत्न वागणूक दिली जाते. निधीचे असमान वाटप करणे, हा पूर्वीपासून अन्याय चालत आला आहे”, अशीही टीका डीके सुरेश यांनी केली.

अंतरिम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना डीके सुरेश म्हणाले की, हा निवडणुकांचा अर्थसंकल्प असून बाकी काही नाही. अंतरिम अर्थसंकल्पाचे नावावर अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेस खासदार डीके सुरेश यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी कडाडून टीका केली. “एकेकाळी काँग्रेस पक्षात सरदार पटेल यांच्यासारखे मोठे नेते होते. ज्यांनी भारत अखंडीत राहण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आज राहुल काँग्रेसमध्ये डीके सुरेश सारखे नेते आहेत. ज्यांना ध्रुवीकरणाचे राजकारण करायचे असून देशाला उत्तर आणि दक्षिण असे विभागायचे आहे”, अशी टीका चंद्रशेखर यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून केली.